कोल्हापूर | सतेज औंधकर : छत्रपती संभाजीराजे भोसले (Sambhaji Raje Bhosale) अपक्ष उभे राहण्यामागे भाजपची (BJP) खेळी असल्याचा धक्कादायक दावा संभाजीराजेंचे वडील शाहू राजे (Shahu Raje) यांनी केला आहे. पक्ष घोषित करणं हा निर्णय चुकला, असेही त्यांनी म्हंटले आहे. दरम्यान, राज्यसभेच्या सहाव्या जागेवरुन राज्यात सध्या राजकारण तापत आहे. संभाजी राजेंना उमेदवारी नाकारल्यानंतर शिवसेनेनेवर (Shivsena) राजकीय पटलांवरुन मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.
शाहू राजे म्हणाले की, 2009 सालापासून संभाजीराजे यांनी वाट वेगळी पकडली आहे. 2016 साली भाजपनं दिलेल्या खासदारकीला माझा विरोध होता. तरीही, संभाजीराजेंनी ती स्वीकारली, असो लोकशाही आहे. त्यावेळी देखील आमची चर्चा झाली नाही. त्यांनी निर्णय घेतल्यानंतर मला सांगितलं होते. यावेळी राज्यसभेवर जाण्याबाबत जानेवारीपासूनच त्यांचे प्रयत्न सुरू होते. पण, त्यांनी मला कल्पना दिली नव्हती.
खासदारकीची टर्म संपल्यानंतर संभाजीराजे फडणवीस यांच्याकडे गेले होते व अर्धा तास त्यांच्यात चर्चा झाली. त्यात काय बोलणं झालं हे माहित नाही. पण, फडणवीस भेटीनंतर लगेचच त्यांनी पक्षाची घोषणा केली आणि अपक्ष उभे राहणार असल्याचे जाहीर केले. खरेतर पक्ष घोषित करणं हा निर्णय चुकलाच, असेही शाहू राजे म्हणाले आहेत.
तर, फडणवीस यांना भेटल्यानंतर त्यांनी काय सल्ला दिला माहित नाही. तुम्ही अपक्ष राहिला तर आम्ही पाठिंबा देतो, असे कदाचित सुचवलं असेल. फडणवीस यांना भेटून आल्यानंतर लगेच संभाजीराजेंनी पक्षांची घोषणा केली हे लिंक केलं पाहिजे, असेही शाहू राजेंनी म्हंटले आहे.