मुंबई : १६ आमदारांच्या अपत्रातेचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी लवकरात लवकर निर्णय घेण्याची आग्रही मागणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. यावरुन शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी संजय राऊत यांच्यावर हक्कभंग आणण्याचा प्रस्ताव राहुल नार्वेकर यांच्याकडे दाखल केला आहे. संजय राऊत अध्यक्षांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे, असा गंभीर आरोप संजय शिरसाट यांनी केला आहे.
शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी खासदार संजय राऊत यांच्याविरोधात हक्कभंग दाखल करण्यासंदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र दिले. विधानसभा अध्यक्षांची प्रतिमा जनमानसात मलिन करण्याचा त्याचप्रमाणे विधिमंडळाचे पावित्र्य धोक्यात आणण्याचा आरोप संजय शिरसाट यांनी राऊतांवर केला आहे. अध्यक्षांच्या अधिकारावर गदा आणण्याचे काम संजय राऊत करत असल्याचेही शिरसाटांनी पत्रात म्हंटले आहे.
संजय राऊत हे सातत्याने विधानसभा अध्यक्ष यांच्या विरोधात सामना आणि माध्यमांशी बोलताना अपमान करत आहेत. अध्यक्षांनी लवकर निर्णय दिला नाहीतर त्यांनी रस्त्यावर फिरु देणार नाही अशी धमकी देणे चुकीचे आहे. विधानसभा अध्यक्ष कधी पक्षाच्या कार्यक्रमात सुद्धा सामील होत नाहीत. कारण ते पक्षपाती नसतात. सर्वसाठी ते समान असतात. माझ्या मते हे कायद्याच्या विरोधात आहे. म्हणून संजय राऊत हे अध्यक्षांचा अपमान करू शकत नाही, असे संजय शिरसाटांनी म्हंटले आहे.