राजकारण

आदित्य ठाकरेंच्या दाव्यावर शिरसांटाचा खुलासा; एकनाथ शिंदे मातोश्रीवर गेले होते, मात्र...

आदित्य ठाकरे यांच्या गौप्यस्फोटामुळे आता राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली असून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

छत्रपती संभाजीनगर : जेलच्या भीतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपबरोबर गेले, असा मोठा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली असून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी आदित्य ठाकरेंचा दावा फेटाळून लावला आहे. मातोश्रीवर जाऊन रडले असं काही झालेलंच नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मातोश्रीवर गेले होते मात्र आमच्या भावना मांडण्यासाठी गेले असल्याचे त्यांनी सांगितले.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आघाडी वेळेसच पक्षामध्ये मतभेद होते. राष्ट्रवादी शिवसेनेला चांगली वागणूक देत नव्हते, निधी देत नव्हते अशा तक्रारी आम्हा सर्व आमदारांच्या होत्या. उद्धव ठाकरे यांना सुद्धा आम्ही या विषयावर बोललो. त्यानंतर एकनाथ शिंदे यांना सांगून अस्तित्व धोक्यात येईल, अशी विनवणी केली.

आम्हाला निधी नाही मिळाला तर निवडून येता येणार नाही, अशी आमची भूमिका होती. एकनाथ शिंदे गट नेते असल्यामुळे आम्ही आमची भूमिका त्यांच्याकडे मांडली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला आणि त्यासाठी ते मातोश्रीवर गेले होते. परंतु, रडले हे वक्तव्य म्हणजे अतिशयोक्ती आहे. उद्धव ठाकरे यांचा गट राष्ट्रवादीसोबत फरफट चालला आहे हे चित्र आम्हाला नको होतं, असे संजय शिरसाट यांनी सांगितले आहे.

तर, नाशिकमध्ये भव्य महिला मेळावा रश्मी ठाकरे घेणार आहेत. यावरुन त्या राजकारणात उतरणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. यावर संजय शिरसाट म्हणाले, त्या जर राजकारणात येणार असेल तर चांगली गोष्ट आहे समाजकार्य करण्यासाठी कुणीही राजकारणात यायला हवं, असे त्यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, आदित्य ठाकरेंनी एका कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांच्या बंडाबाबत गौप्यस्फोट केला. एकनाथ शिंदे यांनी तुरुंगाच्या भीतीने बंड केलं आहे. एकनाथ शिंदे त्यावेळी मातोश्रीवर येऊन रडले होते. केंद्रीय यंत्रणांकडून अटक होणार होती, म्हणून सध्याचे मुख्यमंत्री आमच्या घरी येऊन रडले होते. जर भाजपसोबत गेलो नाही तर ते मला अटक करतील, असे एकनाथ शिंदे यांनी म्हंटल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

मनसेकडून 45 उमेदवारांची यादी जाहीर, अमित ठाकरे यांना माहीममधून संधी

मनसेची यादी जाहीर, 45 उमेदवारांची घोषणा, माहिममधून अमित ठाकरेंना उमेदवारी

महाराष्ट्र विधानसभेकरिता २८८ मतदारसंघासाठी आज राज्यातून ५७ उमेदवारांचे ५८ नामनिर्देशन पत्र दाखल

अभिजीत बिचुकले विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात

निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का; आणखी एका बड्या नेत्याचा ठाकरे गटात प्रवेश