छत्रपती संभाजीनगर : दुसऱ्यांच्या आमदारांना फोडून आणायच्या ऐवजी स्वतःचे आमदार निवडून आणायला शिका आणि पक्ष बांधायला शिका, असा सल्ला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपला दिला होता. याला शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी उत्तर दिले आहे. हे फाटाफुटीचे राजकारण नाही राज साहेबांनी समजून घ्यावे, असे संजय शिरसाटांनी म्हंटले आहे.
राजकारणामध्ये अनेक वेळ काम करणाऱ्यांना जर संधी मिळाली नाही तर असे लोक इतर पक्षात जातात. याला पक्ष फोडणे म्हणत नाही. राज साहेब तुम्ही आणि शरद पवार यांनी स्वतः पक्ष काढले आहेत ना. त्यामुळं हे फाटाफुटीचे राजकारण नाही राज साहेबांनी समजून घ्यावे, असे संजय शिरसाटांनी म्हंटले आहे.
खड्ड्याच राजकारण संपवायला आमचे सरकार आले आहे. ज्यांनी खड्ड्यांचे राजकारण केलं ते गेले, आता आम्ही सगळं सुधारणार आहोत. खड्डे बुजतील सगळे रस्ते व्यवस्थित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
आम्हाला कपाळावर बंदूक ठेवून कुणीही आणलं नाही, बंदूक ठेवणारा अजून जन्माला यायचा आहे. राज ठाकरे काहीतरी वेगळं बोलताय, राष्ट्रवादी भाजप सोबत सत्तेत आली आहे. हे त्यांनी लक्षात घ्यावे, असेही संजय शिरसाट म्हणाले आहेत.
काय म्हणाले होते राज ठाकरे?
भारतीय जनता पक्षाने मध्यतंरी सल्ला दिला की मनसेने रस्ते आणि टोल बांधायला पण शिका. त्यांना इतकंच सांगतो की, दुसऱ्यांच्या आमदारांना फोडून आणायच्या ऐवजी स्वतःचे आमदार निवडून आणायला शिका आणि पक्ष बांधायला शिका. नको ते सल्ले आम्हाला देऊ नका. लोकांच्या डोक्यावर बंदुका ठेवायच्या आणि धाकावर लोकांना पक्षात घ्यायचं आणि त्यानंतर ती लोकं गाडीत झोपून जाणार. यानंतर "मी तुला दिसलो का? मी होतो का." म्हणजे हा निर्लज्जपणाचा कळस नाही का, असा सवाल राज ठाकरेंनी केला होता.