मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी गटाध्यक्षांच्या मेळाव्यात शिवसेना व कॉंग्रेसवर कडाडून टीका केली. या टीकेचा आज शिवसेना नेते संजय राऊत यांनी समाचार घेतला. राजकारण म्हणजे मिमिक्री नाही. आता आपण मॅच्युअरड झालेलो आहे, अशी टीका राऊतांनी राज ठाकरेंवर केली आहे.
संजय राऊत म्हणाले की, राजकारण म्हणजे मिमिक्री नाही. आम्हाला मिमिक्री पाहायचीच असेल तर आम्ही जॉनी लिव्हरची पाहू. हे आवाज काढणे अमूक-तमूक करणे हे आता खूप झाले. आता आपण मॅच्युअरड झालेलो आहे. यापलीकडे जाऊन त्यांनी पूर्ण महाराष्ट्र पाहावा, असे त्यांनी राज ठाकरेंना सुनावले आहे.
उध्दव ठाकरेंवर अथवा अन्य कोणावरही टीका करुन किती दिवस राजकारण करणार आहेत. राजकारणामध्ये काही विधायक कामे करा. संघटनात्मक कामे करा. शिवसेनेवरती एवढी संकटे आहेत. तरी शिवसेना पक्ष उभा राहतोय, लढतोय. ज्यांनी शिवसेनेवर टीका केली. त्यांनी बुलढाण्याचे भाषण ऐकायला हवे होते. बुलढाण्यात उध्दव ठाकरेंना प्रचंड प्रतिसाद मिळाला, असे त्यांनी सांगितले आहे.
तर, राज ठाकरेंनी राहुल गांधी गुळगुळीत मेंदूचे अशी टीका केली होती. यावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. भारत जोडो यात्रेच्या निमित्तााने मागील तीन महिन्यांपासून राहुल गांधींनी ज्या प्रकारे मेहनत आणि कष्ट घेतलेले आहेत. ते त्यांच्यावर टीका करणाऱ्यांनी चार दिवस घेऊन दाखावावेत, असे त्यांनी म्हंटले आहे.
काय म्हणाले होते राज ठाकरे?
कालपरवापर्यंत मुख्यमंत्रीपदावर असलेले आणि आता बाहेर पडलेले तब्येतीचं कारण सांगून घरात बसले होते. एकनाथ शिंदेंनी रात्रीच्या रात्री कांडी फिरवली अन् आता हे सगळीकडे फिरत आहेत. यांच्यासारखं वागणारा मी नाही. स्वत:च्या स्वार्थासाठी दिसेल तो हात हातात घेणारा मी नाही. मी यांच्यासारखा नाही. उद्धव ठाकरेंच्या अंगावर एकतरी केस आहे का? कधी भूमिका घेतलीच नाही. पैशासाठी, स्वार्थासाठी कधी हा कधी तो, मला सत्तेत बसवा, अशी भूमिका घेतली. फक्त पैशासाठी आणि सत्तेसाठी याच्यासोबत त्याच्यासोबत गेले, असे टीकास्त्र राज ठाकरे यांनी उध्दव ठाकरेंवर सोडले होते.