मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना अखेर ईडीने (ED) ताब्यात घेतले आहे. तब्बल साडेनऊ तासांच्या चौकशीनंतर कारवाई करण्यात आली आहे. संजय राऊत यांना घेऊन अधिकारी आता ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. यानंतर संजय राऊतांनी ट्विट केले आहे.
पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांच्या घरी ईडीच्या पथकाने धाड टाकली होती. संजय राऊत यांच्या वेगवेगळ्या मालमत्तांवर छापे टाकण्यात आले असून, भांडुपनंतर कांजूरमार्ग आणि दादर येथील घरावरही ईडीने धाडी टाकल्या. यानंतर अखेर साडेनऊ तासांच्या चौकशीनंतर संजय राऊत यांना ताब्यात घेतले आहे. यावेळी ईडीच्या कार्यालयात नेताना राऊतांनी भगवा शेला फडकवत शिवसैनिकांमध्ये उत्साह भरला. यानंतर संजय राऊतांनी ट्विटरवरुन आपला विश्वास व्यक्त केला आहे. तुम्ही त्या व्यक्तीला हरवू शकत नाही. जो हार मानत नाही. झुकेंगे नही! जय महाराष्ट्र, असे ट्विट त्यांनी केले आहे.
काय आहे पत्रा चाळ प्रकरण?
पत्राचाळ जमीन घोटाळा (Patra Chawl Land Scam) 1,034 कोटी रुपयांचा आहे, असा आरोप करण्यात आला आहे. मुंबईमधील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (म्हाडा) भूखंड आहे. ईडीच्या आरोपानुसार, प्रवीण राऊत यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला ही चाळ विकसित करण्याचे काम देण्यात आले होते. मात्र त्यांनी या जागेचा काही भाग खासगी बिल्डरांना विकला, असा आरोप आहे.