मागील अनेक महिन्यांपासून संजय राऊत हे गोरेगाव पत्राचाळ घोटाळा प्रकरणात कोठडीत होते. कोर्टाकडून अनेक वेळा त्यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली होती. मात्र, उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांना अखेर जामीन मिळाला आहे. त्यामुळे संजय राऊत यांचा तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तब्बल 102 दिवसानंतर राऊत यांना जामीन मिळाल्याने शिवसैनिकांनी राज्यभर जल्लोष केला आहे. अखेर पीएमएल कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. ही जमीन मिळताच आता संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
खासदार संजय राऊत यांना जामीन मिळाल्यानंतर त्यांनी कोर्ट परिसरात पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मी कोर्टाचा आभारी आहे. न्यायदेवतेवर माझा विश्वास आहे. आता मी पुन्हा लढणार, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.
राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होती. त्यामुळे त्यांना आर्थर रोड तुरुंगातून पीएमएलए कोर्टात आणण्यात आले. यावेळी त्यांच्या जामिनावर सुनावणी करताना कोर्टाने राऊत यांना दोन लाखाच्या जातमूचलक्यावर जामीन मंजूर केला. पीएमएल कोर्टाने हा जामीन मंजूर केला आहे.
का संजय राऊत कोठडीत?
पत्राचाळ येथे म्हाडाचा भुखंड होता. हा भुखंड विकसित करण्यासाठी आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला काम दिले होते. पण त्यांनी ही जागा परस्पर खाजगी विकासकांना विकली. पत्राचाळमधील 672 रहिवाशींना 650 स्केअर फुटाचे घर देण्यात येणार होते. त्यांच्या या सोसायटीत अनेक अॅनिमिटी देण्यात येणार होत्या. रहिवाशांना 25 कोटी रुपये कार्पस फंड देण्यात येणार होते. त्यातून रहिवाश्यांचे मासिक मेंटेनेंस भरला जाणार होते. याप्रकरणी ईडीने न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. या आरोपपत्रात पत्राचाळ पुनर्विकासात राऊत यांचा थेट सहभाग असल्याचा दावा करण्यात आला आहे.