उदय चक्रधर | भंडारा : शिवसेना खासदार संजय राऊत सातत्याने भाजपवर टीका करत आहेत. परंतु, याचा फायदा भाजपलाच होणार असल्याचे वक्तव्य भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. तसेच, शिवसेना पक्षप्रमुखांवरही सुधीर मुनगंटीवारांनी टीकास्त्र सोडले आहे. टोमणे मारणे हाच माजी मुख्यमंत्र्यांचा पराक्रम असल्याचा टोला सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला आहे. त्यांनी आज भंडाऱ्यात माध्यमांशी संवाद साधला.
उद्धव ठाकरे हे भाजप आणि शिंदे गटावर नेहमी आसूड ओढत असतात, त्यांच्या प्रतिक्रेवर वने व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी खरमरीत टीका करताना, सत्ता गेल्यानंतर त्यांच्या मनातील जी खदखद आहे, ती अशा शब्दांचा उपयोग व्यक्त करून चिडचिड करण्यात ते वेळ घालवत आहेत. सत्ता गेल्यानंतर त्यांचं एकही भाष्य नाही किंवा भाषण नाही की ज्यामध्ये त्यांनी सव्वा दोन वर्षात राज्यातील जनतेच्या सेवेसाठी एकही निर्णय केला नाही. किंवा ते सांगता येत नाही. कोरोनाच्या नावाने मंदिर बंद केली, मात्र मद्यालय सुरू केलं. उत्पादक शेतकरी बोनस साठी टाहो पडत होते मात्र यांनी भ्रष्टाचार होतो हा मुद्दा समोर करून बोनस दिला नाही. टोमणे मारणे हाच माजी मुख्यमंत्र्यांचा पराक्रम असल्याची बोचरी टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी राज्यपाल पदावरून पदमुक्त करावे, अशी इच्छा व्यक्त करणारे पत्र पंतप्रधान मोदी यांच्याकडे पाठविले. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यपालांना पदमुक्त न करता त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी, नाना पटोले यांचा खरपूस समाचार घेतला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष काय करणार, काय मागणार, यामध्ये कधीच तात्पर्य नाही. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पूर्वी काँग्रेसचे होते. त्यानंतर भाजपात आले त्याच्यानंतर ते पुन्हा काँग्रेसमध्ये गेले, त्यांचा जो पक्ष बदलाचा प्रवास आहे. यावरूनच लक्षात येतं ते काय करतील आणि काय बोलतील, त्यांच्यावर विश्वास ठेवण्याची आता जास्त आवश्यकता नसल्याची प्रतिक्रिया मुनगंटीवार यांनी देताना राज्यपालांनी वयोमानाप्रमाणे खुर्ची पासून दूर राहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांचा आदर्श घेण्यासारखा असून त्यांच्या पत्रावर प्रधानमंत्री योग्य निर्णय घेईल, असे मुनगंटीवार यांनी म्हटले.
शिवसेनेकडून अपेक्षा होती ही खरी आहे, अशी भावभावना अनेकदा व्यक्त केली. पण जर काही लोकांनी श्रद्धेय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराच्या विरुद्धच वागायचे ठरवले असेल तर त्याला उपाय नाही. बाळासाहेब ठाकरे म्हणायचे, ज्या दिवशी काँग्रेससोबत जायचे असेल, त्या दिवशी माझे दुकान बंद करेल. कधी कधी मला वाटते, संजय राऊतजी हे भारतीय जनता पार्टीला अनुकूल लोकांनी व्हावं, मतदारांनी व्हावं म्हणून कदाचित असे नवीन नवीन प्रयोग करीत असावे, असा टोला संजय राऊत यांना लगावला. सध्या संजय राऊत हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधात बोलणाऱ्या राहुल गांधी यांच्यासोबत भारत जोडी यात्रेत सहभागी झाले आहेत, त्यावर प्रतिक्रिया देताना मुनगंटीवार बोलत होते.