मुंबई : शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये युती झाल्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी शरद पवार हे भाजपबरोबर असल्याची टीका केली होती. त्यांच्या विधानाने मोठा गदारोळ निर्माण झाला होता. यावर आज शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. महाविकासआघाडी सामील व्हायचं असेल तर या आघाडीतले प्रमुख स्तंभ आणि नेते आहेत त्यांच्याविषयी आदर ठेवून बोललं पाहिजे, असा इशारा राऊतांनी आंबेडकरांना दिला आहे.
भाजपच्या यंत्रणेनं सर्वाधिक हल्ले शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबियांवर केले आहेत. शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर यांची युती झाली आहे. व आंबेडकर भविष्यात महाविकासआघाडीचे घटक होतील, अशी आमची आशा आहे. याची प्रक्रिया सुरू असेल तर या आघाडीतले प्रमुख स्तंभ आणि नेते आहेत त्यांच्याविषयी सर्वांनी आदर ठेवून बोललं पाहिजे. प्रकाश आंबेडकर यांचे शरद पवारांसोबत मतभेद असू शकतात, हे मतभेद आम्ही एकत्र बसून दूर करू, असे संजय राऊत यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, शरद पवारांबाबतच माझं आधीपासूनचं मत कायम आहे. शरद पवार हे भाजपबरोबर आहेत. तुम्हाला लवकरच कळेल, तुम्ही डोळेझाक करून चालला आहात माझ्यासाठी हे अजिबात धक्कादायक नाही, असे विधान प्रकाश आंबेडकर यांनी केले होते.