सतेज औंधकर | कोल्हापूर
छत्रपती संभाजीराजे भोसले (Sambhajiraje Bhosale) अपक्ष उभे राहण्यामागे भाजपची (BJP) खेळी असल्याचा धक्कादायक दावा संभाजीराजेंचे वडील शाहू राजे (Shahu MaharaJ) यांनी केला आहे. यासोबतच शिवसेनेवर झालेल्या सर्व टीकांना शाहू राजेंनीच उत्तर दिले. यामुळे भाजपने जो संभ्रम निर्माण केला होता. तो त्यांच्या विधानाने दूर झाला, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिली आहे.
संजय राऊत यांनी आज कोल्हापूर येथे अंबाबाईचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्या विरोधी पक्षाला सद्बुद्धी दे, अशी प्रार्थनाही अंबाबाईच्या चरणी केल्याचे संजय राऊत यांनी सांगितले आहे.
शाहू राजेंच्या वक्तव्यावर संजय राऊत म्हणाले की, शाहू राजेंनी आज भूमिका व्यक्त केल्यानंतर भाजपने जो संभ्रम निर्माण केला होता. तो दूर झाला. यावरून कोल्हापूरच्या मातीत सत्य आणि प्रामाणिक पणाची कास सोडलेली नाही हे दिसते. आजही शाहू महाराजांच्या विचारासमोर महाराष्ट्र झुकतो. त्यांच्या वंशजानी सत्याची कास सोडली नाही. मी त्यांना भेटून त्यांचा आशीर्वाद घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीस यांनी संभाजीराजे यांची ठरवून कोंडी केली, असे विधान केले होते. परंतु, देवेंद्र फडणवीसांचे विधान खोटं होत हे शाहू महाराज यांच्या वक्तव्याने स्पष्ट झाले आहे. शिवसेनेने कोणतीही फसवणूक केलेली नाही. शिवसेनेने खालच्या पातळीचे राजकारण कधी केले नाही, असेही त्यांनी म्हंटले आहे.
शाहू महाराज यांचा अनुभव दांडगा आहे. बाळासाहेब ठाकरे यांना छत्रपती शाहू महाराजांचा निकटचा स्नेह मिळाला आहे. ठाकरे आणि छत्रपतींचा स्नेह काय आहे, हे या निमित्ताने उभ्या महाराष्ट्राने पाहिला, असेही संजय राऊतांनी सांगितले.
दरम्यान, संभाजीराजे भोसले अपक्ष उभे राहण्यामागे भाजपची खेळी असल्याचा दावा संभाजीराजेंचे वडील शाहू राजे यांनी केला. तसेच, छत्रपती घराण्याचा अपमानाचा प्रश्नच येत नाही, हे राजकारण आहे. उमेदवारी नाकारली याच्याशी घराण्याचा संबंध नाही, त्यांना व्यक्तिगत उमेदवारी नाकारली आहे. राजकारणात संभाजीराजेंचे सर्व निर्णय व्यक्तिगत होते. घराण्याची किंवा माझी संमती घेऊन पावलं उचलली नाहीत, असेही शाहू राजेंनी स्पष्ट केले होते.