राजकारण

संजय राऊतांचं हक्कभंग नोटीसला उत्तर; हक्कभंग कारवाईची करणे हा विरोधकांचा डाव

संजय राऊतांनी हक्कभंग समितीवरच उपस्थित केले प्रश्न

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : विधीमंडळ हे चोरमंडळ आहे, असं विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले होते. यावरुन राऊतांवर राजकीय वर्तुळात टीका करण्यात येत होती. या विधानावर आक्षेप घेत विधीमंडळात संजय राऊतांवर हक्कभंगही आणण्यात आला आहे. या नोटीसीला आता संजय राऊतांनी एका पत्राद्वारे उत्तर दिले आहे. यात त्यांनी हक्कभंग समितीवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले असून भूमिका स्पष्ट केली आहे. समितीतील सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार असून हक्कभंग कारवाई करणे हा विरोधकांचा डाव असल्याचे राऊतांनी म्हंटले आहे. तसेच, डुप्लिकेट शिवसेनेचे मंडळ हे चोरमंडळ म्हंटल्याचे राऊतांनी स्पष्ट केले आहे.

काय आहे संजय राऊतांचे पत्र?

सन्मानिय विधानसभा सदस्य अतुल भातखळकर व भरत गोगावले यांनी माझ्याविरुद्ध उपस्थित केलेल्या विशेषाधिकार तसेच अवमानाच्या सूचनेवर उत्तर देण्यासाठी आपण मुदत वाढवून दिलीत त्याबद्दल मी आपला आभारी आहे. मी माझी भूमिका अत्यंत थोडक्यात स्पष्ट करतो.

१) महाराष्ट्रात सध्या एक वादग्रस्त, बेकायदेशीर व संपूर्णतः घटनाबाह्य सरकार सत्तेवर विराजमान झाले आहे. सरकारच्या वैधतेबाबत सर्वोच्च न्यायालयातील पाच सदस्यीय खंडपीठाची सुनावणी संपली असून निर्णयाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे हक्कभंग समितीतील काही सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे, असे माझे स्पष्ट मत आहे.

२) माझ्या असे निदर्शनास आले की, ज्यांनी माझ्याबाबत तक्रार केली ते तक्रारदारच हक्कभंग समितीत नियुक्त केले असून तक्रारदारालाच न्यायप्रक्रियेत सहभागी करून घेणे हे नैसर्गिक न्यायाच्या विरोधात आहे, असे माझे तसेच तज्ज्ञांचे मत आहे. हक्कभंग कारवाईबाबत गठीत केलेली समिती ही स्वतंत्र तसेच तटस्थ स्वरूपाची असणे अपेक्षित होते, पण समितीत फक्त माझ्या राजकीय विरोधकांनाच जाणीवपूर्वक स्थान दिल्याचे दिसते. हे संसदीय लोकशाही परंपरेस धरून नाही.

३) विधिमंडळाबद्दल मला सदैव आदर राहिला आहे. विधिमंडळाची अप्रतिष्ठा होईल असे कोणतेच विधान मी केले नाही. तरीरी माझ्या विरोधात हक्कभंग कारवाईची प्रक्रिया करणे हा विरोधकांचा डाव आहे. माझी त्यास हरकत नाही. पण माझे विधान नेमके काय होते ते पहा.

संजय राऊतांची 'त्या' विधानावर भूमिका

आम्हाला सर्व पदे माननीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिली. त्यांनी शिवसेना निर्माण केली. त्यामुळे सध्याचे डुप्लिकेट शिवसेनेचे मंडळ हा विधिमंडळनसून चोरमंडळ आहे." असे माझे विधान १ मार्चच्या कोल्हापुरातील सर्वच वर्तमानपत्रात ठळकपणे प्रसिद्ध झाले म्हणजेच मी विधान मंडळास चोरमंडळ म्हटले नसून एका फुटीर गटापुरताच तो उल्लेख आहे. या चोरमंडळातील सदस्यांवर सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू आहे. यापैकीच काहीजण हक्कभंग समितीचे सदस्य आहेत. त्यामुळे न्यायालयाच्या निकालानंतर हक्कभंग समिती उद्या घटनाबाह्य ठरू शकते. विधिमंडळाचे हसे होऊ नये म्हणूनच मी हे परखड सत्य मांडले. बाकी विधिमंडळात कोणत्याही चोरमंडळास स्थान असू नये हे लोकशाहीचे संकेत व परंपरा आहे. मी त्या परंपरेचे पालन करणारा एक नागरिक आहे, असेही राऊतांनी पत्रात म्हंटले आहे.

Sanjay Raut :इतिहास चंद्रचुड नायडूंना माफ नाही करणार | Maharashtra Vidhansabha Result

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेची आज हॉटेल ताजलँडमध्ये बैठक

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news

आष्टी/बीड: निवडून येताच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर सडकून टीका