पुणे : विधीमंडळाला हे चोरमंडळ असल्याचे विधान ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केले होते. यावर सत्ताधाऱ्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात एकच गदारोळ केला होता. हा विधीमंडळाचा अपमान ठरवत राऊतांना हक्कभंगची नोटीस पाठवण्यात आली आहे. यावर आज संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी विधिमंडळला असं बोलायला वेडा नाही, माझा वक्तव्य फक्त एका व्यक्ती पुरते होते, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.
शिंदे गटाच्या मागणीने अटक होणार असेल तर होऊदे. मी विधिमंडळला असं बोलायला वेडा नाही, माझा वक्तव्य फक्त एका व्यक्ती पुरते होते. मला आलेली नोटीस मी वाचली नाही. मी दौऱ्यावर आहे. नोटीस वाचून ठरवेन काय करायचे ते, असे संजय राऊतांनी म्हंटले आहे.
चिंचवडचा विजय भाजपचा विजय नाही जगताप पॅटर्न महत्वाचा ठरला. तिथे आमचा उमेदवार चुकला. परंतु, कसब्यात सुजाण मतदारांनी चपराक दिली आहे. पुणेकरांना विकत घ्यायचा प्रयत्न केला. मात्र, उपयोग झाला नाही. कसबा तो झांकी है, महाराष्ट्र बाकी है. 2024 मध्ये महाविकास आघाडीने एकजूट दाखवली तर महाराष्ट्रात 200 पेक्षा जागा निवडून येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
संदीप देशपांडे शिवाजी पार्क येथे मॉर्निंग वॉकला गेले असता त्यांच्यानवर अज्ञातांनी हल्ला केला होता. त्यांना रॉड आणि स्टम्पने बेदम मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. याबाबत संजय राऊतांना विचारले असता संदीप देशपांडे यांचा विषय मला माहिती नाही. मी त्यावर बोलणार नाही. कोणी कोणावर हल्ला करत गृहमंत्र्यांनी त्यात लक्ष घालायला पाहिजे, असे राऊतांनी सांगितले.
दरम्यान, काही दिवसापूर्वीच अंकुश काकडे यांची कन्या मोहिनी यांनी ठाकरे गटात प्रवेश केला होता. यानंतर आज अंकुश काकडे यांनी संजय राऊत यांची भेट घेतली. यावेळी अंकुश काकडे यांची कन्या आता शिवसेनेत आली आहे त्यामुळे मुंबईत खऱ्या अर्थाने आता महाविकास आघाडी झाली आहे, असे मिश्कील विधान राऊतांनी केले आहे.