मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत तुरुंगातून सुटल्यानंतर आज माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कौतुक केले. यामुळे राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
संजय राऊत म्हणाले की, राज्यात नवे सरकार बनले आहे. त्यांनी काही निर्णय चांगले घेतले असून त्याचे मी स्वागत करतो. विरोधासाठी विरोध करणार नाही. राज्य, देश व जनतेसाठी चांगले निर्णय फडणवीसांनी घेतले आहेत. आमच्या सरकारने म्हाडाकडून अधिकार काढले होते. ते मला पटले नव्हते. परंतु, नव्या सरकारने म्हाडाला ते अधिकार परत दिले हा चांगला निर्णय आहे.
राज्याचा कारभार उपमुख्यमंत्री करत आहेत. या सरकारचे नेतृत्व फडणवीस करत आहेत. हे माझं निरीक्षण आहे. ते अनुभवी नेते आहेत. महत्त्वाचे निर्णय त्यांच्याकडूनच ऐकायला मिळत आहेत, अशी स्तुतीसुमने त्यांनी फडणवीसांवर उधळली आहेत.
दोन-तीन दिवसांत मी देवेंद्र फडणवीसांना भेटणार आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कोणत्याही पक्षाचा नसतो. त्यांच्या खात्याशी निगडीत काम असल्यामुळे मी त्यांना भेटणार आहे, असे त्यांनी सांगितले आहे. तसेच, दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांची भेट घेणार असून माझ्यावर काय अन्याय झाला हे त्यांना सांगणार आहे, असेही त्यांनी म्हंटले आहे.
काही दिवसांपुर्वी देवेंद्र फडणवीसांनी, महाराष्ट्राच्या राजकारणातील कटुता आता राजकीय वैमनस्यापर्यंत गेली आहे. महाराष्ट्राची अशी राजकीय संस्कृती नाही. त्यामुळे ही कटुता कशी कमी करता येईल यासाठी मी प्रयत्न करणार आहे, असे म्हंटले होते. या भूमिकेचेही संजय राऊतांनी स्वागत केले आहे. ते म्हणाले, मी तुरुंगात होतो. तेव्हा फडणवीस म्हणाले होते कटुता थांबली पाहिजे. त्यामुळे फडणवीस यांना भेटलं तर गैर काय? असं सांगतानाच भाजपच्या विरोधात लढाई सुरूच राहील, असेही त्यांनी म्हंटले आहे.