मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपावरून महाविकास आघाडीमधील वाद समोर आला आहेत. दक्षिण मुंबई मतदारसंघातून उमेदवारी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता मिलिंद देवरा काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. ट्विट करत त्यांनी ही माहिती दिली आहे. देवरा शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं समजत आहे. यावर आता संजय राऊतांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
संजय राऊत म्हणाले की, मिलिंद देवरा जात आहे, त्याबद्दल मला काहीच वाटत नाही. हा महाराष्ट्र आहे कोणी निवडणूक लढवण्यासाठी किंवा एखाद्या पदासाठी जात असतो. अरविंद सावंत हे त्या विभागाचे विद्यमान खासदार आहेत. दोन वेळा ते त्यातून निवडून आलेले आहेत. त्यामुळे अरविंद सावंत जर तिकडे निवडणूक लढणार असेल तर त्यामध्ये चुकीचं काय आहे? ती जागा परंपरेने शिवसेनेची आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, मविआमध्ये दक्षिण मुंबईची जागा ठाकरे गट सोडण्यास तयार नव्हता. यामुळे काँग्रेसमधून मिलिंद देवरा यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी होती. त्यानंतर मिलिंद देवरा यांनी कॉंग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. मिलिंद देवरा शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं समजत आहे. परंतु, दक्षिण मुंबईच्या जागेसाठी भाजप आग्रही आहे. अशातच, देवरा यांच्या प्रवेशामुळे भाजप-शिंदे गटात वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.