मुंबई : एका वर्षापुर्वी शिवसेनेत बंडखोरी झाली आणि एकनाथ शिंदेंसह आमदार व पदाधिकारी ठाकरे गट सोडून शिंदे गटात सामील झाले. मात्र, अद्यापही ठाकरे गटाची गळती थांबण्याचे नाव घेत नाहीये. ठाकरे गटाच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला आहे. यावर आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चाळीस कोटीची कुठली फाईल झाली म्हणून बाई गेल्या असे मी ऐकले, असे राऊत यांनी म्हंटले आहे.
आज दोन नाही तर एकच वर्धापन दिन आहे. बाळासाहेबांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. ५७ वर्ष शिवसेनेचे अग्निकुंड धगधगते आहे. शिवसेनेत अनेक जण आले-गेले. शिवसेना संपविण्याचा प्रयत्न झाला. पण, शिवसेना वाढत राहिली. मुंबई ठाणे बाहेर जाणार नाही म्हंटले जायचे पण दिल्लीत धडक मारली हे फक्त बाळासाहेबांमुळे झाले. मोदी आणि शहांमुळे नाही. आज जो गट आमचे मोदी शहा म्हणतात या सगळ्यांमुळे शिवसेना नाही. बाळासाहेब आणि शिवसैनिकांमुळे आहे, असे संजय राऊत यांनी म्हंटले आहे.
काल गद्दार गटाचे होर्डिंग पाहिले. त्यावर ५९ वा वर्धापन दिन लिहिले आहे, ज्यांना स्थापन दिवस माहित नाही ते शिवसेनेवर दावा सांगत आहेत. निवडणूक आयोगाकडून एक बोगस सात बारा आणला आहे, असाही निशाणा त्यांनी शिंदे गटाच्या वर्धापन दिनावर साधला आहे.
प्रत्येक गोष्ट खोके पैसे ने मोजता येणार नाहीत. चाळीस कोटीची कुठली फाईल झाली म्हणून बाई गेल्या असे मी ऐकले. पण ही लोक येतात कुठून जातात कुठं यावर आम्हाला विचार करावा लागेल. असे लोक येतात आणि जातात. मी त्यांना कचरा म्हणतो. हवा आली की हा कचरा उडून जातो. आम्ही अशा लोकांना मानत नाही. मी अशा लोकांशी ओळख ठेवत नाही, अशा शब्दात संजय राऊतांनी मनिषा कायंदे यांच्यावर टीका केली आहे.
देवेंद्र फडणवीसांना गांभीर्यानं घेऊ नका. त्यांना कोण शेरो-शायरी लिहून देते. त्यांची नौका किती डगमगते त्यांना कळेल. तुफान मे कश्तीया और अहंकार मे हस्तीया डूब जाती है. तुमचा अहंकार तुम्हाला घेऊन डूबेल, अशी टीकाही राऊतांनी फडणवीसांवर केली आहे.