राज्यात सध्या प्रचंड राजकीय गदारोळ सुरू त्यातच दुसरीकडे राज्यात वेगवेगळ्या विषयावर वातावरण तापलेले दिसत आहे. काही दिवसांपूर्वी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनी शिवतीर्थावर मोठा राडा झाला. त्याठिकाणी शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट असा संघर्ष पाहायला मिळाला. त्यानंतर या राड्यावरून तुफान राजकारण होताना दिसत त्यावरच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीकास्त्र डागले आहे. महाराष्ट्र जळतोय याचं यांना काही पडलेलं नाही. राज्य सरकारला पाच राज्यांच्या निवडणूकांची चिंता लागली आहे. देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री आहेत की नाहीत ? कि त्यांना डांबून दुसरा कोणी गृहमंत्रालय चालवतोय. अशा शब्दात राऊतांनी फडणवीसांवर टीका केली.
काय केली राऊतांनी फडणवीसांवर टीका?
माध्यमांशी बोलताना राऊतांनी पुन्हा एकदा भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. शिवतीर्थावरील राड्यावर बोलताना राऊत म्हणाले की, शिवतीर्थावर शिवसैनिक आंदोलकांवर विनयभंगाचे खोटे गुन्हे दाखल करणे ही गृहविभागाची विकृती आहे. शिवतीर्थावर गद्दारांना रोखण्याचा प्रयत्न झाला तर विनयभंगाचे गुन्हे दाखल करता. त्या ठिकाणच्या महिलांची भाषा पाहा. गृहमंत्रालयाने यावर तोडगा काढला नाही तर आम्ही न्यायालयात आणि रस्त्यावर ही लढाई लढू. असा त्यांनी इशारा दिला. फडणवीस राज्याचे गृहमंत्री आहेत की नाहीत हे पहावं लागले. त्यांना कोंडून ठेवून दुसराच कोणी गृहमंत्रालय चालवत आहे का? असा सवाल करत राऊतांनी फडणवीसांवर निशाणा साधला.