अमोल धर्माधिकारी | पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भोंग्यांचे आंदोलन पुकारले होते. परंतु, या सर्व घडामोडींमध्ये राज ठाकरेंचे कट्टर समर्थक आणि पुण्याचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे (Vasant More) यांनी मात्र भोंग्याच्या विषयावर उघड नाराजी व्यक्त केली होती. यानंतर त्यांना शिवसेनेसह अनेक मोठ्या पक्षांच्या ऑफर आल्या आहेत. अशातच वसंत मोरे आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची पुण्यात भेट झाली आहे. यामुळे वसंत मोरे शिवसेनेत जाणार, अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.
पुण्यात एका लग्नात वसंत मोरे आणि संजय राऊत यांची भेट झाली होती. संजय राऊतांनी वसंत मोरे यांना नावाने नाही तर 'तात्या' म्हणून ओळखले. याशिवाय, आगामी निवडणुकीसाठी प्रभाग कुठला? जागा कशी सुटली, आरक्षण कसे आहे, याची संजय राऊत यांनी मोरेंकडे विचारपूस केली. व राऊतांनी वसंत मोरे यांच्या कामाचे कौतुकही केले. तसेच, ठाण्यातील भाषण आपण ऐकल्याचेही राऊत यांनी मोरेंना सांगितले. जाता जाता संजय राऊत यांनी 'भेटू' असे म्हंटले. यावरुन मनसेमध्ये नाराज असलेले वसंत मोरे राऊतांनी पक्षात येण्याची अप्रत्यक्ष ऑफरच दिल्याच्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
राज ठाकरे यांच्या भोंगा आंदोलनावर वसंत मोरे होते. ही नाराजी उघडपणे बोलूनही दाखवली होती. विशेष म्हणजे यामुळे त्यांचे शहर अध्यक्षपद काढून घेण्यात आले होते. यानंतर ते थेट पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा बळावल्या होत्या. मात्र, वसंत मोरेंनी यापूर्वीही अनेकदा आपण कुठेही जाणार नसून, राज साहेबांसोबतच राहणार असल्याचं स्पष्ट केले आहे. परंतु, आज संजय राऊत यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा वसंत मोरे शिवबंधन बांधणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.