मुंबई : छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 एप्रिल रोजी महाविकास आघाडीची सभा होणार आहे. परंतु, छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या घटनेनंतर महाविकास आघाडीच्या सभेवर सावट निर्माण झाले आहे. सभा होणार की नाही याबाबत साशंकता भाजपकडून व्यक्त करण्यात येत होती. परंतु, पोलिसांनी एकूण 15 अटी घालत सभेला परवानगी दिली आहे. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महाविकास आघाडी म्हणून ही पहिली सभा आहे. शिवसेनेचे खेड आणि मालेगाव या ठिकाणी सभा झाली आहे. सभा होणारच आहे. सभा अजिबात रद्द होणार नाही. प्रशासन पोलीस यांच्यावर दबाव आणून अटी-शर्ती टाकल्या आहेत. पण, आम्हाला जे बोलायचं आहे ते बोलू. हजारो लोक विचार ऐकायला येणार आहेत. महाविकास आघाडीचं वेळापत्रक सभेबाबत ठरलं आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले आहे.
तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. गालबोट लावण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना सभा होऊ द्यायची नाही. डॉक्टर मिंधे आणि फडणवीस हे करत आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. महाराष्ट्रात गुढी पाडव्याला शोभायात्रा निघाल्या. त्यावेळी दंगली झाल्या नाहीत. त्यावेळी दगडफेक झाली नाही. पण, रामनवमीलाच का झाली? याचा तपास झाला पाहिजे, असेही राऊतांनी म्हंटले आहे.
दरम्यान, चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणतात यावर राज्य चालत नाहीत त्यांचा पक्ष देखील चालत नाही, असा सणसणीत टोला त्यांनी लगावला आहे. देशभरात दंगल झाली, पश्चिम बंगाल, राजस्थान व महाराष्ट्रात दंगली झाल्या. वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते घाबरले आहेत आणि म्हणून त्यांना पुन्हा सत्ता मिळवायची आहे म्हणून हे चाललंय, असा आरोपही त्यांनी केला आहे.