मुंबई : राज्यातील सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच अयोध्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. तर, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही शिंदे-फडणवीसांवर निशाणा साधला आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून हे सरकार धर्माच्या नावावर पर्यटनाला निघाले आहे. हे ढोग असून प्रभू श्रीरामाचा आशीर्वाद यांना मिळणार नाही, असे राऊतांनी म्हंटले आहे.
महाराष्ट्रात अवकाळी आणि गारपीटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र येथे हाहाकार उडाला आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून हे सरकार धर्माच्या नावावर पर्यटनाला निघाले आहे. हे ढोंग आहे. प्रभू श्रीरामाचा आशीर्वाद यांना मिळणार नाही. धर्माच्या नावावर जे चालले आहे, आम्ही त्याच्या विरोधात नाही आहोत. आम्हीही अनेकवेळा अयोध्येला गेलो आहे. पण, भाजपाचे लोक कधी आमच्याबरोबर अयोध्येला आले नाही, अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.
शिंदेंना अयोध्येचा रस्ता आम्ही दाखवला. परंतु, अयोध्येची जागा राजकारण करण्यासाठी नाही. गेल्या अडीच वर्षांपासून बेईमानीची बीजं पेरली जात होती. यांच्या डोक्यातील बेईमानीचा किडा जुना असल्याची टीकाही राऊतांनी केली आहे.
तर, उद्योगपती गौतम अदानी यांच्यासंदर्भात काही प्रश्न उपस्थित झाले आहेत. अनेक उद्योगपतींना मोदी सरकारने तुरुंगात टाकले आहे. अनेक महत्त्वाचे उद्योगपती आता तुरुंगात आहेत. त्यांनीही काही गुन्हे गौतम अदानी सारखीचं केले. मग, अशा प्रकारची कारवाई अदानी यांच्यावर का नाही, असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला.
दरम्यान, शिवसेनेचा अयोध्या दौरा असताना रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही अयोध्येत दाखल झाले आहेत. फडणवीस अचानक अयोध्येला आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यावर या भूमीशी माझं नातं आहे. रामलल्लाचं दर्शन घेण्याची इच्छा होती म्हणून मी आलोय, असे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले आहे.