मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर उद्या सर्वोच्च न्यायालयाकडून निकाल येणार आहे. शिंदे सरकारचं या सुनावणीवर भवितव्य अवलंबून आहे. या निकालाकडे महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागले आहे. यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही आशावादी आहोत, उद्या लोकशाहीचा विजय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. तर, त्यांना हा देश पाकिस्तानप्रमाणे चालवायचा आहे, असा मोठा आरोपही राऊतांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केला आहे.
पाकिस्तान आज जळत आहे. कारण ते संविधानानुसार सुरु नाही. सरकारे पाडली जाताहेत. न्यायव्यवस्था विकली गेली आहे. हे चित्र या देशामध्ये असू नये. यासाठी उद्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल अत्यंत महत्वाचा आहे. या देशाचा स्वातंत्र्यासाठी हजारो क्रांतिवीरांनी बलिदान दिले आहे. त्यामध्येच आंबेडकरांनी दिलेले संविधान सुध्दा आहे. त्याच्या रक्षणासंदर्भातील निर्णय सर्वोच्च न्यायालय घेईल. म्हणून आम्ही आशावादी आहोत, असे संजय राऊत म्हणाले आहेत.
सत्ताधाऱ्यांकडून आमच्याच बाजूने निकाल लागणार, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, त्यांना हा देश पाकिस्तानाप्रमाणे चालवायंचा आहे. मी फार जाबबादारीने बोलतोयं. आम्ही म्हणत नाही की निकाल आमच्या बाजूने लागेल. आम्ही म्हणतोय की, उद्या संविधानाचा विजय होईल. न्यायव्यवस्थेचा विजय होईल. आम्हाला न्याय मिळेल. न्याय यंत्रणेवर कोणाचा दबाव नसेल तर उद्या न्याय होईल. जर कोणी म्हणत असेल आम्हीच. याचा अर्थ त्यांनी काहीतरी गडबड करण्याचा प्रयत्न केला, अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली आहे. परंतु, आमचा विश्वास आहे की सर्वोच्च न्यायालय स्वतंत्र आहे, असेही त्यांनी म्हंटले आहे.
आमदारांना अपात्र करण्याचा निर्णय कोणाकडे? याबाबतही संजय राऊतांनी भाष्य केले आहे. याआधी नरहरी झिरवळ अध्यक्ष पदी विराजमान होते. तेव्हा त्यांनी एक निर्णय घेतला होता. यावर आताचे विधानसभा अध्यक्ष बोलले तर राज्याच्या ज्ञानात भर पडेल. त्यानंतर काही लोकांना आत्मविश्वास वाटला आहे आम्ही जिंकणार. पण, आम्ही म्हणतो लोकशाही विजय होईल, असे संजय राऊतांनी सांगितले आहे.