सातारा : तुम्ही धर्मवीर की अधर्मवीर असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हणत 40 आमदारांचे मृतदेह गुवाहाटीतून येतील त्यांना थेट शवागृहात पोस्टमोर्टमसाठी पाठवू, अशा शब्दांत त्यांनी बंडखोर आमदारांवर टीकेची तोफच डागली आहे. दहिसरमध्ये आज शिवसेनेचा मेळावा झाला. यावेळी ते बोलत होते.
संजय राऊत म्हणाले की, काहींना महाराष्ट्र तीन भागात तोडायच असून प्रपोजल तयार आहे. विदर्भ, मराठवाडा असे भाग करून मुंबई केंद्रशासित करण्याची योजना आहे. आणि याला शिवसेना विरोध करेल म्हणून शिवसेना संपवायची आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.
तुम्ही धर्मवीर की अधर्मवीर. आम्ही आनंद दिघे यांना जवळून पाहिले आहे. गद्दारांना क्षमा नाही हे मी दिघेंकडून लिहून घेतलं होते. त्यावर खटला झाला आणि त्यांना टाडा लागलेला तेव्हा ते धर्मवीर झाले. तेव्हा हे अधर्मवीर कुठे होते, असा सवाल त्यांनी बंडखोर आमदारांना विचारला आहे. तर, 40 आमदारांचे मृतदेह गुवाहाटीतून येतील त्यांना थेट शवागृहात पोस्टमोर्टमसाठी पाठवू. कामाख्या देवीसाठी 40 रेडे पाठवले आहेत. बळी द्या, अशा शब्दात त्यांनी बंडखोरांवर टीका केली आहे.
ते पुढे म्हणाले, हा गुलाबराव पाटील टपरीवला त्याला कॅबिनेट मंत्री केला. आता पुन्हा पण टपरी टाकणार वाटते. त्यातला एक वॉचमन. त्याला मुंबई माहित नव्हती. त्याला वडा-सांबार खायचा माहित नव्हता. प्रकाश सुर्वे भाजीवाला होता. याला परत भाजी विकायला लागेल. यापुढे प्रकाश सुर्वे पुन्हा विधान सभेत दिसणार नाहीत, असा इशाराच राऊतांनी बंडखोरांना दिला आहे.
माझं भरपूर काही जप्त केलं. माझ्या घरावर रेड पडली त्यावेळी मी दिल्लीत होतो. तरीही मी गुडघे टेकले नाही. झुकेंगे नही. त्यांचं काळीज उंदरांच आहे, असेही संजय राऊत म्हणाले आहेत. तसेच, आपण महनगर पालिका प्रचंड मतांनी जिंकलो तर 40 गद्दार लोक गाडले जातील,
दरम्यान, एकनाथ शिंदे बंडखोर आमदारांसह गुवाहटीतील ब्लू रेडीयन्स हॉटेलमध्ये राहत आहे. आज सहावा दिवस असून लवकरच भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याची शक्यता आहे. अशातच आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला आहे. यानंतर राज्यापाल राजभवनावर परतले आहेत. यामुळे राज्यात सत्ता स्थापनेच्या हालचालींनी वेग येणार आहे.