मुंबई : सत्यपाल मलिक यांनी केलेल्या पुलवामा खुलाशावर पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प बसले आहेत. मोदी यांचा मौनी बाबा नक्की का झाला? त्यांच्या जिभेला असा मौनाचा आजार का जडला? लोक मरोत, जगोत, सैनिक बॉम्बस्फोटांत मरोत, लोक चिरडून मरोत, आम्हाला काय त्याचे? सरकार त्याच भूमिकेत आहे, अशी घणाघाती टीका ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली आहे. पुलवामा गौप्यस्फोटावर राऊतांनी सामना रोखठोकमधून मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
माणसांच्या जिवाची सध्या कोणालाही किंमत नाही व पातळी घसरलेल्या राजकारणाने तर सध्या मरण सगळय़ात स्वस्त केले.‘पुलवामा’ येथे 2019 साली घडलेल्या 40 जवानांचे हत्याकांड हे मोदी सरकारच्या निपियतेचे बळी होते. राजकीय फायद्यासाठी ‘पुलवामा’ हत्याकांडाचा वापर भारतीय जनता पक्षाने केला. जम्मू-कश्मीरचे माजी राज्यपाल असलेल्या सत्यपाल मलिक यांची एक सनसनाटी मुलाखत प्रसिद्ध झाली. उत्तर प्रदेशात गँगस्टर अतिक अहमदचे हत्याकांड त्याच वेळी घडवून मलिक यांनी 40 जवानांच्या हत्याकांडावर केलेला स्फोट दडपण्याचा प्रयत्न झाला, असे संजय राऊतांनी म्हंटले आहे.
पुलवामा हल्ला हा सरकार प्रायोजित होता काय? 2019 च्या निवडणुका जिंकता याव्यात यासाठी सुनियोजित पद्धतीने रचलेले हे राजकीय षङयंत्र होते काय? अशा शंका आता उघड झाल्या आहेत. सत्यपाल मलिक यांना तोंड बंद ठेवण्यास सांगितले गेले, पण ‘पुलवामा’ पद्धतीचा हल्ला होण्याची दाट शक्यता आहे असा अंदाज गुप्तचर खात्याने दिला होता. ‘फ्रंटलाइन’ नियतकालिकाच्या फेब्रुवारी 2021 च्या अंकात झालेला खुलासा भाजपच्या अंध भक्तांनी चष्मा लावून पाहायला हवा. पुलवामा हल्ल्याच्या दोन दिवस आधी गुप्तचरांनी हल्ल्याचा संपूर्ण ‘प्लान’ केंद्रीय गृह मंत्रालयाकडे पाठवला. मात्र, सरकारने अक्षम्य दुर्लक्ष केले व 40 जवान प्राणास मुकले. राष्ट्रद्रोह आणि सदोष मनुष्यवध यालाच म्हणतात.
आयबी म्हणजे केंद्रीय गुप्तचर खात्याने पुलवामा हल्ल्याच्या संदर्भात इत्थंभूत माहिती आधीच पोहोचवली. सरकारने त्याकडे डोळेझाक केली व जवान मारले गेले. त्यामुळे सत्यपाल मलिक यांनी आता केलेल्या स्फोटाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. देशाचे संरक्षणमंत्री, गृहमंत्री, पंतप्रधान व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यावर चूप आहेत. एरवी लांबलचक ‘फेकू’ भाषणे ठोकणारे भाजपवाले गप्प आहेत. अतिक अहमदच्या हत्येचे श्रेय घेणारे, माफिया राज संपवले, साफ धुळीस मिळवले असे सांगणारे भाजपवाले व त्यांचे सरकार सत्यपाल मलिक यांच्या खुलाशावर एक शब्द बोलत नाहीत. कदाचित मलिक यांना ठार वेडे, भ्रष्टाचारी किंवा देशद्रोही ठरवून तुरुंगात टाकण्याचे कारस्थान रचण्यात हे सगळे दंग असावेत, अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली आहे.
पंतप्रधान व त्यांचे सहकारी गौतम अदानींच्या लुटमारीवर गप्प बसले व आता 40 जवानांच्या हत्याकांडावर सत्यपाल मलिक यांनी केलेल्या खुलाशावर गप्प बसले. पुलवामा खुलाशावर तर त्यांची दातखिळीच बसली आहे. आपले पंतप्रधान मोदी नोटाबंदीच्या अपयशावर आणि रांगेतल्या शेकडो बळींवर बोलत नाहीत, मोदी अदानींच्या घोटाळय़ावर बोलत नाहीत व जे मोदी सर्जिकल स्ट्राइकच्या फटाकेबाजीवर जाहीर सभांतून बोलत राहिले, ते मोदी पुलवामाच्या निर्घृण हत्याकांडावर सत्यपाल मलिक यांनी जो स्फोट केला, त्यावरही बोलत नाहीत, असा सवाल राऊतांनी विचारला आहे.