राजकारण

'धर्मराजा सांग, अदानींच्या कंपनीत 20 हजार कोटी कोणी गुंतवले?'

संजय राऊतांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : ‘मोदी-अदानी’ ही नावे आता भ्रष्टाचाराची प्रतीके झाली आहेत, पण सरकारी भ्रष्टाचारास विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांकडे बोट दाखवून आपले प्रिय पंतप्रधान मोदी म्हणतात, “भ्रष्टाचारात सामील झालेले सर्व चेहरे एकाच मंचावर आले आहेत.” मोदी यांचे हे विधान बेताल आहे व मोदींच्या या विधानावर टाळ्या वाजवणारे बिनडोक आहेत. हे लोक देशाला रोज खड्ड्यात टाकत आहेत. राहुल गांधी यांनी चोरांना चोर म्हटले व त्याबद्दल त्यांची खासदारकी रद्द केली, दिल्लीतील घर काढून घेतले. ज्या देशात चोरांना चोर म्हणण्याचे स्वातंत्र्य नाही त्या देशाचे नेतृत्व हे चोर आणि दरोडेखोरांच्याच हाती असते, असा जोरदार हल्लाबोल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सामना रोखठोकमधून केला आहे.

गौतम अदानी आणि पंतप्रधान मोदी यांचे नाते नेमके काय? अदानी यांच्या भ्रष्टाचाराचे संरक्षक म्हणून पंतप्रधान पहाडासारखे का उभे आहेत? अदानी यांच्या कंपनीत बेकायदेशीरपणे गुंतवलेले 20 हजार कोटी रुपये नक्की कोणाचे? असे प्रश्न राहुल गांधी यांनी विचारले. त्या प्रश्नांची उत्तरे निदान ‘ईडी’ आणि सीबीआयने तरी द्यायला हवीत. मात्र खऱ्या चोरांना संरक्षण व दरोडेखोरांना प्रतिष्ठा देण्याचे काम या दोन्ही संस्था आज करीत आहेत. मोदी म्हणतात, सत्तर वर्षांत काँग्रेस सरकारने काहीच केले नाही. फक्त सात वर्षांत भाजपने देश प्रगतीपथावर नेला. हे सगळ्यात मोठे असत्य आहे.

देशात गरिबी व बेरोजगारांचा आकडा वाढत आहे. गरीबांना अधिक गरीब बनवून त्यांना रेशनवर फुकट 5-10 किलो धान्यांची भीक घालणे याला मोदींचे सरकार प्रगती आणि विकास मानत आहे. 67 वर्षांत देशातील सर्व सरकारांनी मिळून 55 लाख कोटींचे कर्ज घेतले होते, पण ‘मोदी’ सरकारने मागच्या फक्त सात वर्षांतच 85 लाख कोटींचे कर्ज घेतले. या 85 लाख कोटींचा हिशेब मागणाऱ्यांना भ्रष्टाचारी ठरवले जाते. या 85 लाख कोटींची मलई अदानी यांच्या खिशात मोठ्या प्रमाणावर गेली, असे संजया राऊतांनी म्हंटले आहे.

“अदानी यांची सर्व संपत्ती ही मोदी यांचीच आहे. अदानी हा फक्त चेहरा आहे. त्यांच्या सर्व संपत्तीचे खरे मालक आपले ‘फकीर’ पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आहेत,” असा आरोप अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या विधानसभेत केला. मोदी व त्यांच्या मंडळींचा पैसा अदानी ‘मॅनेज’ करतात व अदानी यांना फक्त 10-20 टक्के – कमिशन मिळते, असा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल पुराव्यासह करतात व ईडी, सीबीआय त्यावर गप्प बसते. न्यायालये ‘स्युमोटो’ पद्धतीने पुढे जात नाहीत. अशा विकलांग अवस्थेत आज आपला देश आहे.

ज्या देशाच्या पंतप्रधानाला सर्वाधिक श्रीमंत होण्याचा छंद जडला आहे तो स्वतःला ‘फकीर’ म्हणवून घेतो व विरोधकांना भ्रष्टाचारी म्हणतो. हे सरळ सरळ ढोंग आहे. केजरीवाल यांनी अदानी यांनी गिळंकृत केलेल्या सर्व कंपन्यांची यादीच जाहीर केली, असेही त्यांनी सांगितले.

गांधी यांनी मोदींकडे फक्त 20 हजार कोटींचे रहस्य विचारले. केजरीवाल म्हणतात, ‘अदानी म्हणजेच मोदी आहेत. हेच सत्य आहे. ‘ ‘मारुती कांबळेचे काय झाले?’ या प्रश्नाप्रमाणे अदानींच्या कंपनीत गुंतवलेले 20 हजार कोटी कोणाचे? हा प्रश्न महत्त्वाचा. सर्वत्र हाच ‘यक्ष’ प्रश्न विचारला जात आहे. मोदींच्या 20 हजार कोटींनी समाजमाध्यमांवर धुमाकूळ घातला आहे.

धर्मराज म्हणजे युधिष्ठिर तहानेने व्याकूळ झाला होता. चारही पांडव भाऊ जंगलात पाण्याचा शोध घेण्यासाठी गेले, ते अद्यापि परत का आले नाहीत या चिंतेने धर्मराज ग्रासला होता. भाऊ परतले नाहीत तेव्हा धर्मराज स्वतःच त्या अरण्यात भावांचा शोध घेण्यासाठी निघाला व एका तळ्याजवळ जाऊन पोहोचला. पाहतो तर काय? त्याचे चारही ‘पांडव’ भाऊ तेथे जणू गतप्राण होऊनच पडले होते, पण घशाला कोरड पडली होती, जीव कासावीस झाला होता म्हणून ओंजळभर पाण्यासाठी त्याने तलावात हात घालताच सारस पक्ष्याच्या स्वरूपातील एका यक्षाने त्याला थांबवले.“थांब! तुझ्या भावांनीही माझे ऐकले नाही. माझ्या प्रश्नांची उत्तरे न देता पाणी प्राशन केलंस तर पाण्याचे विष होईल.” यक्ष. धर्मराज म्हणाला, “विचार प्रश्न!” यक्षाने प्रश्न केला, “धर्मराज सांग, अदानींच्या कंपनीत 20 हजार कोटी रुपये कोणी गुंतवले?” पहिल्याच प्रश्नाने धर्मराज गोंधळला. यक्षाकडे त्याने हतबलतेने पाहिले. कोपरापासून नमस्कार केला. “येतो मी” सांगून मागे फिरला व तहानेने व्याकूळ होऊन आपल्या भावांच्या जवळ कोसळला! आता मोदी, अदानी यांनीच उत्तर देऊन यक्षप्रश्न सोडवावा व पाच भावांचे प्राण वाचवावे, असा महाभारतातील किस्साही संजय राऊतांनी सांगितला आहे.

Lokshahi Marathi Live Update : INDIA आघाडीच्या प्रमुख नेत्यांची सोमवारी दिल्लीत बैठक

Tejaswini Pandit: "आमचा राजा हरला नाही, महाराष्ट्र हरलास तू" ! तेजस्विनी पंडितची राज ठाकरेंसाठी भावनिक पोस्ट

IPL Mega Auction 2025 Live: तिसरा महागडा खेळाडू! व्यंकटेश अय्यर

Sharad Pawar: महायुतीच्या 'त्या' प्रचाराचा मविआला फटका बसला...

Ulhas Bapat | लोकशाहीत विरोधीपक्ष नेता असणं का महत्त्वाचं? घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचं विश्लेषण