मुंबई : निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले. आता या निर्णयामुळे ठाकरे गटात आणि शिंदे गटात वाद आता आणखीच तीव्र झाला आहे. यावरूनच टीका सुरु झाली असतानाच ठाकरे गट नेते संजय राऊत यांनी शिंदे गटावर आणि भाजपवर मोठा आरोप केला आहे. शिवसेना नाव आणि चिन्ह मिळवण्यासाठी 2000 कोटींचा सौदा झाल्याचा दावा त्यांनी केली आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
संजय राऊत यांनी एक ट्विट करत शिंदे गटावर आणि भाजपवर मोठा आरोप केला आहे. माझी खात्रीची माहिती आहे. चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी आता पर्यंत 2000 कोटींचा सौदा आणि व्यवहार झाले आहेत. हा प्राथमिक आकडा आहे आणि 100 टक्के सत्य आहे, असा मोठा दावा त्यांनी केला आहे. बऱ्याच गोष्टी लवकरच उघड होतील. देशाच्या इतिहासात असे कधीच घडले नव्हते, असेही राऊतांनी म्हंटले आहे.
सोबतच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या काही ओळीही ट्विट केल्या आहेत. ही न्याय व्यवस्था रखेल झाली, ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली, मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे...! कारण इथली न्याय व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली, अशा ओळी ट्विट करत संजय राऊतांनी शिंदे-फडणवीस सरकारवर घणाघात केला आहे.
दरम्यान, याआधीही संजय राऊतांनी माध्यमांशी संवाद साधताना शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला होता. आम्ही सगळे फक्त धनुष्यबाण जे चोरणारे लोकं आहेत त्यांच्या तपासाला लागलेलो आहोत. ही चोरी त्यांना महाग पडेल. चोरांना अनेक ठिकाणी रस्त्यात पकडून मारलं जातं. चोर हातात सापडला तर त्यांना रस्त्यावर लोकं कपडे काढून मारतात. धनुष्यबाणाच्या चोरांनासुद्धा अशाप्रकारे राज्याची जनता रस्त्यावर पकडून धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका त्यांनी केली होती.