नाशिक : ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणात आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु झाले. यामध्ये थेट मंत्री दादा भुसे यांच्यावर सुषमा अंधारे यांनी आरोप केले आहेत. अशातच, आता संजय राऊत यांनी दादा भुसेंच्या राजीनाम्याची मागणी करत गंभीर आरोप केला आहे. दादा भुसे पुरावे संदर्भात छेडछाड करत आहेत, असा आरोप संजय राऊतांनी केला आहे.
संजय राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राची काळजी असेल तर नाशिकमधील ड्रग्स प्रकरणाची चौकशी करतील. ससूनमध्ये इतके दिवस तो व्यक्ती कसा राहिला, तो जेलमधून कसा बाहेर आला? त्याला कुठल्या भाजपाच्या माणसाने मदत केली हे सगळ रेकॉर्डवर आलेले आहे. सर्वात आधी दादा भुसे यांचा राजीनामा घेतला पाहिजे ते पुरावे संदर्भात छेडछाड करत आहेत.
तर, दादा भुसे यांनी शेतकऱ्यांचे 178 कोटी रुपयांचे अपहार केले आहे. मला दादा भुसे यांची नोटीस आली आहे. दादा भुसे यांनी कितीही खटले दाखल केले तरी हे लपून राहणार नाही. मी या संदर्भात ईडीकडे तक्रार केली आहे. 2024 मध्ये तरी कारवाई होईल, असे त्यांनी म्हंटले आहे.
आमदार अपात्रतेसंदर्भातील सर्व याचिका एकत्र करण्यावर आज सुनावणी होत आहे. यावर बोलताना राऊत म्हणाले, सुनावणीबाबत अपेक्षा काय असणार? विधानसभा अध्यक्ष यांनी वेळकाढूपणा केलेला आहे. विधानसभा अध्यक्षांनी संविधान आणि कायदाचा मुडदा पडलेला आहे. न्यायालयाने सांगून देखील निर्णय झाला नाही, अशी टीका त्यांनी केली आहे.
छगन भुजबळ खोटं बोलत आहेत. महविकास आघाडी ही शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीनही पक्षाच्या नेत्यांनी केली आहे. महाविकास आघाडी सुरू असताना भुजबळ नुकतेच तुरुंगातून सुटून आले होते. भुजबळ आता काय म्हणत आहेत याला महत्व नाही. त्यांना मंत्रिपद हवा होता आणि ईडीपासून संरक्षण हवा होता म्हणून ते तिथे आहेत. मात्र फाईल कधी बंद होत नाही, असे सूचक विधान राऊत यांनी केले आहे.