कोल्हापूर : कर्नाटकातील टोल नाक्यावर महाराष्ट्रातील गाड्यांवर दगडफेक करण्यात आली. यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादाचा मुद्दा पुन्हा चिघळला आहे. या वादाचे लोण आता राज्यात सर्वत्रच पसरले असून कर्नाटकचा निषेध करण्यात येत आहे. यावरुन शिंदे-फडणवीस सरकारवरही जोरदार टीका करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी कर्नाटक सरकारला इशारा दिला आहे. चुकीची कृती करणार असेल तर आम्हीही उत्तर देऊ, असे त्यांनी म्हंटले आहे.
संभाजीराजे म्हणाले की, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर संभाजीराजेंनी प्रतिक्रिया दिली आहे. कर्नाटकमधील लोकांकडून ज्या गाड्याची तोडफोड झाली ती वाईट आहे. मुख्यमंत्री बोम्मई यांचे विधान चुकलं. कर्नाटकमधील कानडी बांधव आमचेच. पण, चुकीची कृती करणार असेल तर आम्ही त्यांना उत्तर देवू, असा इशारा संभाजीराजेंनी दिला आहे.
तर, विशाळगड हा एक शक्तीकेंद्र किल्ला आहे. विशाळगडावर शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजाराम महाराज, ताराराणी याचे वास्तव्य होते. पण, याच किल्यावर महाभयानक परिस्थिती आहे. याला जबाबदार शासनाचे सर्व डिपार्टमेंट आहेत. आता आम्हाला चूक कोणाची हे बघायचे नाही. विशाळगड ग्रामस्थांनी अतिक्रमण झालं आहे हे कबुल केले आहेत. हे अतिक्रमण आम्ही काढून घेऊ, असे सांगितले आहे. पण, विशाळगडावर अवैध व्यवसाय सुरू आहे. विशाळगडावर असणारा हा गचाळपणा निघाला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
महाशिवरात्री आधीच अतिक्रमण काढण्याची प्रक्रिया सुरू करतो. ज्याचे नाव कागदावर दिसत त्यांना तिथं राहू देत. पण, बाकीच्यांना तिथून काढा. विशाळगडवर जो मूळ दर्गा आहे आहे तो राहू दे. त्याची अडचण नाही. पण, त्याचे सुशोभिकरणाच्या नावाखाली जो विकास केलाय तो काढून घ्यावा. अतिक्रमण करण्यासाठी ज्यांनी परवानगी दिलीय त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. सगळ्या किल्यावर झालेलं अतिक्रमण निघायला हवे. सरकारने समिती स्थापन करतो, असे बोलले आहेत, ते काय करतात ते पाहू, असेही संभाजीराजेंनी म्हंटले आहे.
दरम्यान, बेळगाव सीमाभागातील हिरेबागवाडी टोलनाक्यावर काल महाराष्ट्रातून कर्नाटकात गेलेल्या सहा ट्रकची तोडफोड कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी केल्यानंतर राज्यात संतापाची लाट आहे. याचे संसदेच्या हिवाळी अधिवेशनाही पडसाद उमटताना दिसत आहे. कर्नाटकमध्ये महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ला करण्यात आल्याने राज्यातील नेते संताप व्यक्त करत असून प्रतिक्रिया उमटत आहेत. यावर एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांसोबत माझी चर्चा झाली. एसटी, गाड्यांची तोडफोड करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा निर्णय त्यांनी घेतला आहे. हे प्रकरण सुप्रीम कोर्टात असेपर्यंत दोन्ही राज्यातील जनतेला त्रास होऊ नये, अशी आमची चर्चा झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांशीही याबाबतबत माझी चर्चा झाली. इथून पुढे असे प्रकार होणार नाहीत, असे शिंदेंनी सांगितले.