महाविकास आघाडीच्या काल मुंबईत महामोर्चा पार पडला. त्या मोर्च्यावरून राज्यात एकच आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहे. त्यातच फडणवीसांनी हा मोर्चा नॅनो मोर्चा असल्याचं म्हटले होते. त्यानंतर मविआकडून त्यांना उत्तर देण्याचे सत्र सुरु झाले. या दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज एक व्हिडीओ ट्वीट केल्यानंतर राजकारण चांगलंच तापलं आहे. राऊतांनी मराठा क्रांती मोर्चाचा व्हिडीओ ट्वीट केल्याचा दावा भाजप आणि मराठा क्रांती मोर्चाकडून केला जात आहे. यामुळे राऊतांवर चहुबाजूने टीका होत आहे. त्यावरच बोलताना संभाजीराजे छत्रपती यांनी संताप व्यक्त केला आहे.
काय म्हणाले संभाजीराजे?
संजय राऊत यांनी आज एक व्हिडीओ ट्वीट केल्यानंतर राजकारण चांगलंच तापलं आहे. त्यावरच अनेक प्रतिक्रिया येत आहे. त्यावर बोलताना संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, ज्या मोर्चाला तुम्ही मुका मोर्चा म्हणून हिणवले तोच मराठा क्रांती मोर्चा आज स्वतःच्या राजकारणासाठी वापरत आहात. या मोर्चाची चेष्टा करणारेही तुम्हीच होता. आज नसलेली ताकद दाखविण्यासाठी एकेकाळी ज्या मराठा समाजाला हिणवलं, त्यांचाच मोर्चा वापरताना जरा तरी तमा बाळगा. असा संताप संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केला आहे.
काय होते राऊत यांचे ट्विट?
देवेंद्र फडणवीस ज्यास नॅनो मोर्चा म्हणून हिणवत आहेत तो हाच! महाराष्ट्र प्रेमी जनतेचा बुलंद आवाज. देवेंद्र जी. हे वागणे बरे नाही.जय महाराष्ट्र! असं राऊतांनी व्हिडीओ ट्वीट करत म्हटलं आहे. या व्हिडीओवरुन टीका होऊ लागल्यानंतर राऊतांनी पुन्हा एक ट्वीट करत म्हटलं आहे की, मराठा मोर्चा देखील महाराष्ट्र स्वाभिमान, न्याय्य हक्कांसाठी निघाला.शिवरायांचा जयघोष करीत त्याच मार्गावरून त्याच ताकतीने निघाला.तेव्हा देखील आजच्याप्रमाणे विराट मोर्चाची चेष्टा दबक्या आवाजात हेच लोक करत होते.दोन्ही मोर्चे महाराष्ट्राचा स्वाभिमान दाखवणारे होते. तूर्त इतकेच! असं राऊतांनी दुसरं ट्वीट करत म्हटलं.