मुंबई : येथील अंतरवली जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तरुण आंदोलन करत होते. यावेळी आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज करत हवेत गोळीबार केला आहे. यावर सर्वच स्तरावरुन प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच, संभाजीराजे भोसले यांचीही प्रतिक्रिया दिली आहे.गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ खुलासा द्यावा, अन्यथा तुम्हाला समाजाच्या रोषास सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
संभाजीराजे म्हणाले की, अंतरवाली सराटी या गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संविधानिक मार्गाने आंदोलनास बसलेल्या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी घेराव घालत अमानुष लाठीचार्ज केला व शांततेच्या मार्गाने आपले हक्क मागण्यासाठी जमलेल्या मराठा समाज बांधवांस पांगवण्यासाठी गोळीबार केला. हे कृत्य अत्यंत निंदनीय असून कुणाच्या आदेशाने हे सर्व घडले याचा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ खुलासा द्यावा, अन्यथा तुम्हाला समाजाच्या रोषास सामोरे जावे लागेल.
मराठा समाजाला दिलेल्या या अमानुष वागणूकीमुळे राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सर्वथा राज्याचे गृहमंत्री व सरकार जबाबदार असेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
काय घडले नेमके?
जालन्याच्या अंतरवाली गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आक्रोश मोर्चाचं उपोषण मागील चार दिवसांपासून सुरु होते. उपोषणा दरम्यान आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली. जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडल्याने पोलिसांकडून उपोषण थांबवण्याचं प्रयत्न सुरु होते. त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर केला. गावकऱ्यांनी दगडफेक केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.