अमोल धर्माधिकारी | मुंबई : एकनाथ शिंदे यांच्यासह 35 आदारांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेने आता कडक भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. तर एकनाथ शिंदेही माघार घेण्यास तयार नाहीत. यामुळे ठाकरे सरकार आता अस्त होण्याच्या मार्गावर आहे हे निश्चित झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यसभेत मला उमेदवारी दिली असती तर आज शिवसेनेवर ही वेळ आली नसती, असे म्हणत छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी शिवसेनेला डिवचले आहे.
संभाजीराजे भोसले यांनी आज संत तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं दर्शन घेतले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की. राज्यसभेत मला पुरस्कृत उमेदवारी दिली असती तर आज शिवसेनेवर ही वेळ आली नसती. तसेच, शिवसेनेतील बंड हे त्यांचा वैयक्तीत प्रश्न आहे. मात्र, उद्या कोणाचेही सरकार आले तर त्यांनी आधी सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवावेत, असेही त्यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्याशी अनेक वेळा संपर्क साधूनही ते भाजपसोबत सत्ता स्थापन करण्यावर ठाम आहेत. यामुळे ठाकरे सरकार कोसळण्याची चिन्हे आता स्पष्टपणे दिसत आहेत. अखेर शिवसेनेने कडक भूमिका घेत बंडखोर आमदारांना मुख्यमंत्री निवासस्थान वर्षा बंगल्यावर संध्याकाळी बैठकीत उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. बैठकीला उपस्थित न राहिल्यास कारवाई करणार असल्याचा थेट इशाराच बंडखोर आमदारांना देण्यात आला आहे.