मंगेश जोशी | जळगाव : छत्रपती संभाजी राजे यांनी नुकतीच स्वराज्य संघटनेची घोषणा केली असून स्वराज्य संघटने विषयी भाष्य करताना आजच्या राजकारणात साम-दाम-दंड-भेद असल्याशिवाय पुढे जाता येत नाही व त्यातील महत्त्वाची बाब ही पैसा असल्याचे मत संभाजी राजे यांनी व्यक्त केले आहे. मात्र आपल्याकडे काळा पैसा नसतांना संभाजी राजे केवळ तीनशे वर्षाच्या इतिहासावर बोलत पुढे कसा जाणार? असा प्रश्न उपस्थित करत तीनशे वर्षाच्या अगोदरची परिस्थिती आजही अजून हे लोकांना समजतंय. त्यामुळे आपण सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पुढे जात असल्याचे संभाजी राजे म्हणाले.
तसेच आपले संघटन वाढवताना भाजप किंवा शरद पवारांनी किती खासदार आणलं. ते संपूर्ण आयुष्य राजकारणात घालून शरद पवारांना एक हाती सत्ता अजूनही आणता आली नाही मला याचा काही विचार करायचा नसून मी सकारात्मक असल्याचे संभाजी राजे म्हणाले. दरम्यान महाराष्ट्रातले अनेक नेते हे पर्यायासाठी थांबले असल्याचे म्हणत स्वराज्य संघटनेला दोन-पाच वर्षे लागतील. मात्र, तोपर्यंत काही तोटा नाही व मी झोपेत स्वप्न बघत नाही. मला दिवसाला स्वप्न बघायला आवडत असून लोकांची इच्छा असेल तर स्वप्न पूर्ण होईल. त्यामुळे मी सकारात्मक विचार करत असून कष्ट करणाऱ्या माणसाकडे यश चालून येत असल्याचेही संभाजी राजे म्हणाले.
शरद पवारांनी तिकीट दिलं आणि मी सुदैवाने हरलो
2009 मध्ये शरद पवारांनी तिकीट दिलं आणि सुदैवाने मी हरलो, असे म्हणत पराभवानंतर महाराष्ट्रात फिरलो त्यावेळेस लोकांनी भरपूर प्रेम दिलं. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांची कर्मभूमी ही फक्त कोल्हापूर असू शकत नाही. ती महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात होणे गरजेचे असल्याचे वाटले म्हणून मी बाहेर पडलो, असे संभाजी राजे म्हणाले. दरम्यान, २००९ च्या निवडणुकीत प्रसंगी मोठ्या प्रमाणात पैसे गेले असल्याचे मान्य करत ईडी - बीडी असले तरी आपल्याला सांगायला हरकत नाही, असे देखील संभाजी राजे म्हणाले आहेत.