पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज संपूर्ण राज्यभरात जल्लोषात साजरी होत आहे. अशातच, शिवनेरीवर मात्र गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले. शिवप्रेमींना शिवनेरीवर दर्शन घेण्यास अडवण्यात येत होते. मात्र, काही व्हिआयपींना पासेस देऊन शिवनेरीवर सोडण्यात येत होते. हे पाहून माजी खासदार संभाजी छत्रपती चांगलेच संतापले. याच मुद्द्यावरुन सर्वांसमोरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कडाडले.
मुख्यमंत्री यांचे स्वागत करतो. हा शासकीय कार्यक्रम आहे. मी एकदाच हेलिकॉप्टरने आलो होतो. पण, दरवर्षी शिवभक्तांसह चालत येतो. मी येत असताना जन्मस्थळ ठिकाणी निघालो असता शिवभक्तांना अडविण्यात आले. आम्हाला का अडवले? व्हीआयपी पासेस का? मी स्वतः शिवभक्तांसह थांबण्याचा निर्णय घेतला. कारण किल्ला लहान असून दरी आहे. दरवर्षी हेच चालले आहे. आम्ही किती सहन करायचे. मला कार्यक्रमस्थळी थांबवले म्हणून नाहीतर मी पण निघून गेलो असतो, अशा शब्दात संभाजीराजेंनी मुख्यमंत्र्यांना सुनावले.
पुरातत्त्व विभागाने सांगितलं महाराजांचा जन्म झाला तिथे जाता येणार नाही. तसं असेल तर मग इतर कुणालाही तिथं जाऊ देऊ नका. फक्त शिवप्रेमींनाच बंदी का? पुरातत्त्व खात्याचा हा कुठला नियम आहे? आम्हाला तुमची भाषण ऐकायची आहे. बाकीच्या गड किल्ल्यांचं संवर्धन कसं करणार हे सुद्धा आम्हाला पाहायचं आहे. त्याचं उत्तर द्या, असे देखील आव्हान त्यांनी दिले.
शिवनेरीवर दुजाभाव करु नका. शासकीय शिवजयंती साजरी करा. पण, माझी विनंती आहे की, शासकीय कार्यक्रम सकाळी १०पर्यंत करा. इथपर्यंत सोडू नका. कार्यक्रम झाल्यावर आम्हाला आत जाऊन दर्शन घेऊ द्या. शासकीय पासेस ठिक आहेत. पर्सनल पास कशाला देता? हा कोणता क्रायटेरिया आहे? जिल्हाधिकाऱ्यांनी कोणता नियम लावला? याची माहिती हवी, अशी मागणी संभाजीराजेंनी केली आहे.