भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज्यांबद्दल काल एका वृत्तवाहिनीशी बोलताना वादग्रस्त विधान केले होते. त्यासोबतच राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सुद्धा वादग्रस्त विधान केले होते. त्यावरून राज्यात मोठा वाद निर्माण झाला आहे. यावरून विरोधी पक्ष भाजपवर जोरदार हल्ला चढवत आहे. त्यावरच आता संभाजी छत्रपती यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. परभणी दौऱ्यावर असताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाले संभाजी छत्रपती?
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांच्या विधानावर बोलताना संभाजी छत्रपती म्हणाले की, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी असो किंवा भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेले वक्तव्य हे अत्यंत दुर्दैवी आहे.
अशी वक्तव्य केली जात असताना मी तरी किती बोलायचं. समाज हे सर्व बघत आहे. यांनी केलेली वक्तव्य खरी असतील तर त्यांनी समोर येऊन ते खरे कसे आहेत हे सांगावं. तसेच याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर द्यावं. कारण त्यांच्या पक्षातील नेतेच अशी वक्तव्य करत आहेत. त्यामुळे त्यांनी याची उत्तरे द्यावेत अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे.