काही दिवसांपूर्वी राज्यात हर हर महादेव या चित्रपटावरून एकच गदारोळ सुरु आहे. त्यातच हा वाद आता शमल्यानंतर पुन्हा एकदा संभाजराजे छत्रपती आक्रमक झाले आहे. कारण हा वादग्रस्त चित्रपट आता झी मराठी या वाहिनीवर प्रदर्शित होणार आहे. त्यावरूनच हर हर महादेव हा वादग्रस्त चित्रपट टिव्हीवर प्रदर्शित केल्यास होणाऱ्या गंभीर परिणामांना झी स्टुडिओ जबाबदार असेल, असा इशारा संभाजीराजे छत्रपती यांनी दिला आहे.
काय म्हणाले नेमकं संभाजराजे छत्रपती?
१८ डिसेंबर रोजी झी मराठी या वाहिनीवरून टीव्हीवर हा हर हर महादेव चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे. मात्र, त्याआधी संभाजराजे छत्रपती यांनी फेसबुकच्या माध्यमातून झी स्टुडिओला इशारा दिला आहे. ते म्हणाले की, हर हर महादेव हा वादग्रस्त चित्रपट टिव्हीवर प्रदर्शित केल्यास होणाऱ्या गंभीर परिणामांना झी स्टुडिओ जबाबदार असेल. हर हर महादेव हा चित्रपट थिएटर मध्ये बंद पडल्यानंतर आता १८ डिसेंबर रोजी झी मराठी या वाहिनीवरून टीव्हीवर प्रदर्शित केला जाणार आहे. इतिहासाचे चुकीच्या पद्धतीने सादरीकरण करण्यात आलेला व तमाम शिवभक्तांच्या भावना दुखावणारा हा चित्रपट टिव्हीवर प्रदर्शित करू नये, याबाबत #स्वराज्य संघटनेने झी स्टुडीओला पत्र लिहून सूचित केले आहे. या सूचनेकडे कानाडोळा करून हर हर महादेव चित्रपट टिव्हीवर प्रदर्शित केल्यास होणाऱ्या गंभीर परिणामांना झी स्टुडिओ जबाबदार असेल. इशारा संभाजीराजे यांनी दिला आहे.
या कारणामुळे चित्रपटाला विरोध
या चित्रपटात चुकीच्या पद्धतीने इतिहास दाखवल्याचा आरोप करण्यात आलाय. अनेक इतिहास अभ्यासकांनी देखील या चित्रपटात चुकीचा इतिहास दाखवल्यावरून नाराजी व्यक्त केली आहे. तर 'हर हर महादेव'च्या निर्मात्यांना कायदेशीर नोटीस पाठवणार' असा इशारा बाजीप्रभू देशपांडे यांच्या वंशजांनी दिलाय. चित्रपटात अनेक व्यक्तींचं चारित्र्य हनन केल्याचाही वंशजांनी आरोप केलाय.