अमोल धर्माधिकारी | पुणे : महात्मा गांधीचा खून माथेफिरु नथुराम गोडसेंनी केला. पण, महात्मा गांधींच्या विचाराचा खून पंडित जवाहरलाल नेहरू यांनीच केला, असे धक्कादायक विधान रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी केले आहे. जाधवर इन्स्टिट्युट आयोजित ६ व्या युवा संसदेत सदाभाऊ खोत उपस्थित होते. यावेळी त्यांनी हे विधान केले. दरम्यान, सदाभाऊ खोत यांच्या विधानावरुन आता नवा राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे. यावर कॉंग्रेस काय उत्तर देणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
काय म्हणाले सदाभाऊ खोत?
महात्मा गांधीचा खून माथेफिरु नथुराम गोडसेंनी केला. पण, महात्मा गांधींच्या विचाराचा खून पंडित जवाहरलाल नेहरू यांनीच केला. खेडी लुटा, असे नेहरु यांनीच सांगितले. मी परखड बोलतो. बोलावं लागेल, असेही सदाभाऊ खोत यांनी म्हंटले आहे.
तसेच, यादरम्यान सदाभाऊ खोत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले. राजकारणात दोन वर्ग आहे एक प्रस्थापित आणि एक विस्थापित. देवेंद्र फडणवीस यांना कुणी काहीही म्हणो. त्या माणसानं ओळखलयं की प्रस्थापितांमधील विस्थापितांना आपल्यात कसे घ्यायचे. आणि त्याचमुळे मी आणि गोपीचंद पडळकर आम्ही दोघे त्यांच्यासोबत गेलो आणि आमदार झालो. प्रस्थापित राजकारणातले अलीकडच्या काळातले त्यांचं नाव मी घेणार नाही. मागच्या दाराने अनेक जणांना आमदार केले, असा खुलासाही त्यांनी केला.
याच प्रस्थापित घराण्यांनी सत्ता आपल्या हातात ठेवण्यासाठी कायदे केले आणि जनतेला लुटण्यासाठी कायदे मूठभर लोकांनी तयार केले आणि उद्योग त्यांच्या हातात ठेवले. बँका त्यांच्याच ताब्यात आहेत. प्रस्थापितांचे राजकारण उद्ध्वस्त करायचे असेल तर विस्थापितांना राजकारणात आणावं लागेल. हे देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं, त्यामुळे मला आणि गोपीचंद पडळकर या जोडगोळीला राजकरणात आणलं, अशी टीका खोत यांनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादीवर केली.
आम्ही आंदोलने प्रस्थापितांच्या विरोधात केली. तेव्हा समजल की फडणवीस हा माणूस कामाचा आहे. देवेंद्र फडणवीस हा माणूस मला आवडला. त्या माणसाचं एक वैशिष्ट्य आहे. आमच्या लक्षात आले की हा गडी या गड्याची जिरवू शकतो. पण लगेच जाती बाहेर आल्या. यांचे वाडे जर उद्ध्वस्त करायचे असतील तर देवेंद्र यांच्यासारखा गडी मिळाला आणि त्याच्यासोबत पुढे सुटलो, असेही सदाभाऊ खोत यांनी म्हंटले आहे.