समृद्धी महामार्गावर सतत अपघातांची मालिका सुरुच आहे. अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आता ठाकरे गटाचा अग्रलेख सामनातून टीका करण्यात आली आहे. सामनातून म्हटले आहे की, गेल्याच महिन्यात या महामार्गावर खासगी ट्रव्हल्स बसच्या भीषण अपघातात सुमारे 25 प्रवाशांचा जळून मृत्यू झाला होता. आता शहापूर तालुक्यातील सरलांबे येथे पुलाचे काम सुरू असताना सोमवारी मध्यरात्री भयंकर दुर्घटना घडली. त्यात 20 कामगारांचा जागीच मृत्यू झाला.गर्डर मशीनला जोडणारी क्रेन आणि स्लॅब तब्बल शंभर फुटांवरून कामगारांवर कोसळला. आता या दुर्घटनेची चौकशी करण्याचा सोपस्कार राज्य सरकारने केला आहे. नुकसान भरपाई जाहीर केली आहे.
समृद्धी’ महामार्ग हा म्हणे सध्याच्या राज्यकर्त्यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ आहे. असेलही, पण तुमचे हे ‘स्वप्न’ निरपराध्यांसाठी ‘काळस्वप्न’ ठरत आहे, त्याचे काय? पुन्हा समृद्धी येणार वगैरे ‘दिवास्वप्न’च आहेत.समृद्धी महामार्गावरील आजवरच्या अपघातांमध्ये मरण पावलेल्यांच्या किंकाळय़ा, त्यांच्या नातलगांचा आक्रोश यामुळे ना सरकारच्या कानाचे पडदे फाटत आहेत ना हृदयाला पाझर फुटत आहे.नावात ‘समृद्धी’ असलेल्या महामार्गावरील अपघात आणि दुर्घटनांची मालिका थांबायला तयार नाही. ज्या समृद्धीच्या वल्गना या महामार्गाच्या निर्मात्यांनी केल्या ती समृद्धी कधी येणार, हे कोणीच सांगू शकत नाही, परंतु या महामार्गावरील अपघात, दुर्घटना आणि निरपराध्यांच्या बळींमध्ये मात्र दिवसेंदिवस ‘वृद्धी’च होत आहे.
राज्यकर्त्यांनी समृद्धीच्या महामार्गाचे स्वप्न जरूर पाहावे, पण निरपराध्यांचे रक्त आणि त्यांच्या कुटुंबीयांचे अश्रू यामुळे जर तुमचा हा महामार्ग सतत भिजत असेल तर त्याला ‘समृद्धी’ कशी म्हणणार? अपघातग्रस्त समृद्धी महामार्गाने उपस्थित केलेला हा जळजळीत सवाल आहे. असे सामनातून म्हटले आहे.