ठाकरे गटाचा अग्रलेख सामनातून भाजपावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. सामनातून म्हटले आहे की, संसदेत सत्ताधारी पक्षाचे सभागृह नेते हे बेफामपणे विरोधकांना ‘देशद्रोही’ म्हणतात व त्याविरोधात आवाज उठवणाऱ्या खासदारांना संसदेतून बडतर्फ केले जाते. मणिपूरच्या हिंसाचारावर नियम 267 नुसार चर्चा व्हावी व पंतप्रधान महोदयांनी त्यावर निवेदन करावे, अशी मागणी करणाऱया संजय सिंह, डेरेक ओब्रायन या राज्यसभा सदस्यांवर कठोर कारवाई केली. दिल्लीतील लोकशाही मार्गाने सत्तेवर आलेल्यांचे अधिकार काढून घेतले व त्यांना पंगू केले.
हिंदुस्थानातच उभे राहून हिंदुस्थानात लोकशाहीची हत्या होत असल्याचा आरोप केला जातोय, हीच लोकशाही देशात जिवंत असल्याची निशाणी असल्याचे साळवे म्हणतात. साळवे जे म्हणत आहेत ते मान्यच केले पाहिजे. सध्याचे सरकार राजकीय विरोधकांना आज फक्त धमक्या देतेय, चौकश्यांचा ससेमिरा लावून बेजार करतेय. अद्यापि त्यांना विनाचौकशी फासावर लटकवले जात नाही हे आपल्या देशात लोकशाही जिवंत असल्याचेच लक्षण आहे.
सर्व भ्रष्टाचाऱ्यांवर आधी ‘ईडी’ लावायची व मग त्यांना पक्षात घेऊन मंत्री करायचे हा स्वातंत्र्याचा अपमान आहे; पण हा स्वैराचार म्हणजे लोकशाहीची हत्या नव्हे, असे इंग्लंड वगैरे ठिकाणी बसलेल्या आपल्या विद्वानांना वाटणे हे या महान देशाचे दुर्दैव आहे. असे म्हणत सामनातून जोरदार टीका करण्यात आली आहे.