मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यावरुन ठाकरे गटाचा अग्रलेख सामनातून टीका करण्यात आली आहे. सामनातून म्हटले आहे की, शिंदे हे अनेक वर्षांपासून गडचिरोलीचे पालकमंत्री पद भूषवीत आहेत. या पालकमंत्री पदाचा व नक्षलवाद्यांचा काहीएक संबंध नसून गडचिरोलीतील ‘माईनिंग’ उद्योगावर नियंत्रण राहावे व तेथील आर्थिक उलाढालीत सहभागी होता यावे यासाठी गडचिरोलीची योजना आहे. नक्षलवादाशी मुकाबला वगैरे फक्त बहाणा आहे. मुख्यमंत्री महोदयांचे बूड महाराष्ट्रात टिकत नाही व ते सतत दिल्लीस पळत आहेत. पालकमंत्री कुणाला नेमायचे, महामंडळांचे वाटप कसे करायचे, असे प्रश्न घेऊन मुख्यमंत्री ऊठसूट दिल्ली वाऱ्या करतात. स्वाभिमानासाठी पक्षत्याग करणाऱ्यांचे हे असे हाल सुरू आहेत.
शिंदे गटाच्या विचारांतून, कृतीतून, जाहिरातींतून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव व छायाचित्र आता हटवले गेले आहे. आता फक्त ‘मोदी मोदी-शहा शहा’चा गजर सुरू आहे. उद्या ते शिवसेनेची स्थापना मोदींमुळे झाली, मोदींचीच शिवसेना खरी असे बोलायलाही कमी करणार नाहीत. दिल्लीने ‘ऊठ’ म्हटले की उठायचे व ‘बस’ म्हटले की बसायचे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या पायजम्याची नाडी दिल्लीच्या हातात आहे. त्यामुळे शिवसेना या महाराष्ट्र अभिमानी पक्षाचे नाव त्यांनी धुळीस मिळविले आहे.
मुख्यमंत्र्यांनी दिल्लीला जाब विचारायचे सोडून ते दिल्लीत जर्जर झालेल्या सर्कशीतल्या वाघाच्या भूमिकेत शिरून बसले आहेत. कोविड काळात गंगेत प्रेते तरंगत होती तशी प्रेते आता महाराष्ट्रातील सरकारी रुग्णालयांत पडली आहेत, पण आपले स्वाभिमानी की काय ते मुख्यमंत्री कोठे आहेत? ते दिल्लीत काय करीत आहेत? महाराष्ट्रात शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी, महिला बेहाल आहेत. सरकारी रुग्णालयांना स्मशानकळा आली आहे. रोज कुठे ना कुठे मृत्यूची छापेमारी सुरूच आहे. या सर्व तणावाच्या स्थितीत ना मुख्यमंत्री जागेवर आहेत ना दोन उपमुख्यमंत्री. लंडनवरून वाघनखे येतील, पण दिल्लीने महाराष्ट्राची नखे कापून वाघाच्या आयाळीस हात घातला आहे. असे सामनातून म्हटले आहे.