ठाकरे गटाचा अग्रलेख सामनातून शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करण्यात आली आहे. सामनातून म्हटले आहे की, मुख्यमंत्री शिंदे हे काही दिवसांचेच पाहुणे आहेत असा सर्वोच्च न्यायालयाचाच निवाडा आहे. त्यांचे मुख्यमंत्रीपद जसे बेकायदा आहे तसे त्यांचे हिंदुत्वदेखील ढोंगी आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी ‘ढोंगांतर’ करून जे हिंदुत्व स्वीकारले ते बेगडी आहे. शिंदे आता म्हणतात, उद्धव ठाकरेंना हिंदुत्ववादी म्हणवून घेण्याचा अधिकार नाही. मुख्यमंत्री आणखी बरेच काही बरळले. ते त्यांचे राजकीय वैफल्य आहे. ज्याप्रमाणे अन्नात भेसळ होते त्याप्रमाणे हिंदुत्वात मिलावट करण्याचा प्रयत्न होतोय, असा दिव्य संदेश शिंदे यांच्या मिंध्या डोक्याने दिला.
तसेच हिंदुत्वाचे ‘मिलावटराम’ असा उल्लेख त्यांनी केला. यानिमित्ताने त्यांना राम आठवला हे बरे झाले. अन्नात भेसळ करणाऱ्यांना जर हे महाशय मिलावटराम म्हणत असतील तर ज्यांनी तुमच्या ताटात आतापर्यंत सुग्रास जेवण वाढले ते जेवण ओरपून बेइमानी करणाऱ्यांना ‘नमकहराम’ म्हटले पाहिजे. समाजवादी हे धर्मनिरपेक्ष, तरीही वाजपेयींच्या सरकारात ते सामील झाले. समाजवादी सरकारात आल्याने भाजपचे ‘हिंदुत्व’ मिलावटी राम झाले नव्हते काय? मुख्यमंत्री शिंदे यांनी पुढच्या काळात विधिमंडळ ग्रंथालयाचा वापर करणे गरजेचे आहे. इतिहासाची पाने चाळली तर त्यांच्या अगाध ज्ञानाची त्यांनाच लाज वाटेल . ‘उचलली जीभ लावली टाळ्याला’ हा त्यांचा प्रकार राज्याची प्रतिष्ठा धुळीस मिळवत आहे . मिंध्यांनी पक्षांतर केले व ढोंगांतरही केले . त्यातून निर्माण झालेला ‘ माजवाद ‘ जनता कायमचा गाडेल! असे म्हणत सामनातून जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे.