मुंबई : अंधेरी-पूर्व मतदारसंघाचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. परंतु, शिंदे गट त्यांना मंत्रिपदाचं आमिष दाखवून दबाव टाकत आहे, असा आरोप शिवसेना नेते आमदार अनिल परब यांनी केला आहे. ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते.
अनिल परब म्हणाले की, रमेश लटके यांच्या निधनानंतर अंधेरी पोटनिवडणूक जाहीर झाली. शिवसेनेच्या वतीने ऋतुजा रमेश लटके यांची उमेदवारी जाहीर केली होती. रमेश लटके सर्वात लहान वयातील शाखा प्रमुख म्हणून अंधेरीमध्ये काम केलं. एकनिष्ठ म्हणून रमेश लटके यांनी काम केलं आहे. त्यांच्या कुटुंबाला आधार मिळावा यासाठी त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर केली. त्या पालिकेत लिपिक पदावर काम करत आहेत.
2 सप्टेंबर 2022 रोजीच त्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर त्या राजीनामाविषयी विचारायला गेल्या असता त्यांना सांगण्यात आलं की, राजीनामा स्वीकारला जाऊ शकत नाही. 3 ऑक्टोबर 2022 ला राजीनामा दिला. राजीनामा देताना 1 महिन्याचा अवधी द्यावा लागतो. तो त्यांनी दिला होता. जर एक महिना अवधी होत नसेल तर 1 महिन्याचा पगार कोषागारात जमा करायचा असतो. त्याबाबतही सर्व काही क्लीअर आहे. सगळी फाईल तयार आहे. परंतु, राजीनामा स्वीकारला जात नाही आहे. अधिकाऱ्यांना राजीनामा स्वीकारू नका, असे आदेश दिले आहेत. अधिकाऱ्यांवर सरकारचा दबाव आहे. राजीनाम्याची फाईल आयुक्तांकडे जायला नको. जॉईंट आयुक्त यांच्याकडे हा राजीनामा स्वीकार होतो, असा थेट आरोप त्यांनी केला आहे.
ऋतुजा लटके यांना शिंदे गट आमिष देत आहेत, असं बातम्यांमध्ये वाचलं. मंत्री पद देतो असं आमिष देत आहेत. जाणीवपूर्वक ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्वीकारला जात नाही. या विरोधात आज आम्ही कोर्टात गेलो आहोत. आमचे सगळे प्लॅन तयार आहेत. वेळ आल्यावर कळेल, असा इशाराही परबांनी दिले आहे.
अंधेरीची जागा शिवसेनाच लढणार. ऋतुजा लटके यांच्याशी सततचं बोलणं चालू आहे. ऋतुजा लटके शिंदे गटाकडे जाणार म्हणजे राजीनामा स्वीकारणार? याचा अर्थ काय होतो. आम्ही जेवढ्या अधिकाऱ्यांना भेटल त्यांनी सांगितलं की आयुक्तांचे आदेश आले की राजीनामा स्वीकारू असं सांगितलं, असेही त्यांनी सांगितले आहे.
शिवसेनेचा जन्म संघर्षातून झाला आहे. चिन्हावर संघर्ष झाला तर लढू. निवडणूक आयोगाने जर ते चिन्ह दिलं असेल तर विचार करूनच दिलं असेल, अशी प्रतिक्रिया अनिल परब यांनी दिला आहे. शिवसेनेला मिळालेले मशाल या चिन्हावर समता पक्षाकडून दावा केला जात असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केले.
तर, राजीनामा मंजूर न झाल्यास कोर्टात जाणार का, या प्रश्नावर अनिल परब म्हणाले, ऋतुजा लटके यांनी वैयक्तिक पिटिशन दाखल केली आहे. पक्षाकडून अद्याप करण्यात आलेली नाही. न्या. नितीन जामदार यांच्या खंडपीठासमोर हे प्रकरण आहे. ऋतुजा लटके यांच्या बाजूने अॅड. विश्वजित सावंत न्यायालयीन लढाई लढणार आहेत, अशीही माहिती त्यांनी दिली आहे.