मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काल पाडवा मेळाव्यात केलेल्या काही वक्तव्यांमुळे राज्यात नवा वाद उभा राहिला आहे. राज ठाकरेंनी कालच्या आपल्या भाषणात मशिदीवरील भोंग्याबद्दल (Loudspeakers) वक्तव्य करत नव्या वादाला तोंड फोडलं आहे. तसंच त्यांनी शरद पवारांवर (Sharad Pawar) केलेल्या टीकेमुळे राष्ट्रवादी (NCP) विरुद्ध मनसे (MNS) असा वाद उभा राहिला आहे. या वादावर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असतानाच काही दिवसांपूर्वीच मनसे सोडून राष्ट्रवादीत आलेल्या रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Thombare) यांनी देखील राज ठाकरेंवर टीका केली आहे.
राज ठाकरेंनी कालच्या आपल्या भाषणात महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांवर टीका केल्याचं पाहायला मिळालं. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावरही त्यांनी टीका केली. त्यानंतर आता रुपाली पाटील ठोंबरे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. तसंच त्यानंतर त्या म्हणाल्या की, शनिवारच्या सभेत भाजपनं जी सुडबुद्धीनं खेळी केली, त्यात फायर ब्रँड असलेले राज ठाकरे फ्लॉवर झाले का ? असा प्रश्न पडतो.
राज ठाकरेंनी शरद पवारांवर केलेले जातीवादाचे आरोप देखील रुपाली ठोंबरेंनी फेटाळून लावले. त्या म्हणाल्या आमच्या पक्षात सर्व जाती धर्माचे लोक आहेत. कार्यकर्ते, मंत्री पदाधिकारी सर्व जाती धर्माचे आहे, आमचा पक्ष जातीयवादी असता तर एका विशिष्ट समाजाचे लोक पक्षात असते, त्यामुळे राज ठाकरेंच्या या टीकेला अर्थ नाही असं त्या म्हणाल्या.