मुंबई : किरीट सोमैया यांच्या व्हिडिओ प्रकरणी मुंबई पोलिसांनी 'लोकशाही' चॅनलच्या संपादकांविरोधातच गुन्हा दाखल केला आहे. किरीट यांच्या तक्रारीनंतर संपादक कमलेश सुतार यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती मिळते आहे. याचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. तर, राजकीय वर्तुळातूनही यावर प्रतिक्रिया उमटत आहे. अशातच, अजित पवार गटातील नेत्या रुपाली ठोंबरे-पाटील यांची प्रतिक्रिया समोर येत आहे.
रुपाली ठोंबरे-पाटील यांनी ट्विटरवरुन प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, लोकशाही चॅनेल संपादक विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे असे समजले. माझी सरकारला विनंती आहे की लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून काम करणाऱ्या पत्रकारांविरुध्द विनाकारण गुन्हे दाखल नकोत. त्यांनी बातमी ब्लर करून दाखवली आहे, सरकारला विनंती आहे दाखल केलेला गुन्हा त्वरित मागे घ्यावा, असे त्यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्याने राज्यभरात खळबळ माजली होती. किरीट सोमैय्या यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीत याची चौकशी करण्याची मागणी केली होती. तर, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल, कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही, असे फडणवीसांनी अधिवेशनात म्हंटले होते. सोमय्यांच्या व्हिडीओची राज्य महिला आयोगाने दखल घेत पोलिसांना तात्काळ अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते.