मुंबई : अभिनेत्री उर्फी जावेदवरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेताना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर टीका केली होती. या टीकेला आज रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिले आहे. चित्रा वाघ यांनी राज्य महिला आयोगाच्या अवमान केला आहे. त्या कारणाने त्यांना नोटीस पाठवली आहे. चित्रा वाघ यांनी दोन दिवसांत खुलासा करावा अन्यथा राज्य महिला आयोग एकतर्फी निर्णय देईल, असा इशारा त्यांनी चित्रा वाघ यांना दिला आहे.
रूपाली चाकणकर म्हणाल्या की, अनुराधा वेब सीरिजचे दिग्दर्शक संजय जाधव यांना राज्य महिला आयोगाने नोटीस पाठवली होती. आयोगाकडे आलेल्या तक्रारी वरून ही नोटीस पाठवली होती. तेजस्विनी पंडित यांना नोटीस दिली आणि उर्फी जावेद यांना दिली नाही या आरोपात तथ्य नाही. राज्य महिला आयोग स्वतंत्रपणे काम करतो. असं असताना राज्य महिला आयोगाची प्रतिमेला तडा जाईल असे वर्तन चित्रा वाघ यांनी केले आहे त्या कारणाने त्यांना नोटीस पाठवली आहे. चित्रा वाघ यांनी 2 दिवसांत खुलासा करावा अन्यथा राज्य महिला आयोग एकतर्फी निर्णय देईल, असा इशारा त्यांनी चित्रा वाघ यांना दिला आहे.
रघुनाथ कुचिक प्रकरण, संजय राठोड प्रकरणात मास्टर माईंड कोण हे सांगणार म्हणाल्या होत्या. मात्र, त्यांनी स्वतचं हसे करून घेतलं. मुंबई पोलीस आयुक्तांना त्या भेटल्या त्यांनीही त्यांची दखल घेतली नाही. चित्रा वाघ बालिशपणा करत आहेत, अशी टीका चाकणकरांनी केली आहे.
खासदार राहुल शेवाळे यांचा विषय निकालात निघत नाही. तोवर नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या बद्दलही तक्रार आली आहे. चित्रा वाघ यांनी त्यावर बोलावे. ज्यांच्यावर बलात्काराचे आरोप आहेत ते लोक विश्व मराठी संमेलनात जाऊन बसले. छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात महिला आयोग हे खपवून घेणार नाही, असाही घणाघात त्यांनी केला आहे.
एका महिलेने तक्रार केली आहे. भाकरीच्या तुकड्या ऐवजी कपड्याच्या तुकड्या वर त्या बोलत आहेत, असा सणसणीत टोला रुपाली चाकणकर यांनी चित्रा वाघ यांना लगावला आहे.