आपल्या वादग्रस्त विधानाने कायम चर्चेत राहणारे शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे आता पुन्हा एकदा वक्तव्याने प्रकाश झोतात आले आहे. यावेळी त्यांनी महात्मा गांधी यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केलीय. त्यामुळे राज्यात प्रचंड गदारोळ निर्माण झाला आहे. यावर विविध राजकीय नेत्यांची प्रतिक्रिया येत असताना आता यावरच केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय म्हणाले आठवले?
उल्हासनगर येथे माध्यमांशी बोलत असताना त्यांनी संभाजी भिडे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, संभाजी भिडे यांच्या वयाला हे विधान शोभत नाही. ते अनेक वेळेला आपल्या पद्धतीने भूमिका मांडतात. त्यामुळे जनतेच्या भावना दुखवतात. महात्मा गांधी हे स्वातंत्र्य सेनानी होते. इंग्रजांच्या काळात त्यांनी चांगल्या प्रकारे लढा दिला होता. गांधीच्या विरोधात असं वक्तव्य करणं त्यांच्या वयाला शोभत नाही. मला असं वाटतं अशा प्रकारचे वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडेंवर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी कारवाई करावी. अशी मागणी करत आठवलेंनी यावर प्रतिक्रिया दिलीय.