राज्यात एकीकडे राजकीय गोंधळ सुरु असताना अशातच आज मनसेप्रमुख राज ठाकरे यांचा गोरेगावमधील नेस्को सभागृहात गटप्रमुखांचा मेळावा पार पडला. राज ठाकरे आजच्या या मेळाव्यात काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. याच सभेत चौफेर निशाणा साधत टीका केली. राज्यात चालू असलेल्या सर्वच विषयावर त्यांनी भाष्य केले.
राज ठाकरे यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे
नेस्को सभागृहात मोठ्या प्रमाणात मनसे कार्यकर्ते जमा झाले होते. यावेळी राहुल गांधी यांच्या सभेत काळे झेंडे फडकवणाऱ्या चौघांचा राज ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
फेब्रुवारी मार्चमध्ये निवडणुका होण्याची चिन्हं आहेत. वातावरणात निवडणुका दिसत नाहीत. राज्यात सध्या सर्व बाजूने खोळंबा झाला आहे. या गटाला मान्यता मिळणार की नाही मिळणार यांना चिन्ह मिळणार की नाही मिळणार. त्यांना त्यांची डोकी खाजवू द्या आपण आपलं काम करू.
कालपरवापर्यंत मुख्यमंत्रीपदावर असलेले आणि आता बाहेर पडलेले तब्येतीचं कारण सांगून घरात बसले. एकनाथ शिंदेंनी रात्रीच्या रात्री कांडी फिरवली अन् आता हे सगळीकडे फिरत आहेत. यांच्यासारखं वागणारा मी नाही. स्वत:च्या स्वार्थासाठी दिसेल तो हात हातात घेणारा मी नाही. मी यांच्यासारखा नाही. उद्धव ठाकरेंच्या अंगावर एकतरी केस आहे का? कधी भूमिका घेतलीच नाही. पैशासाठी, स्वार्थासाठी कधी हा कधी तो, मला सत्तेत बसवा अशी भूमिका घेतली. फक्त पैशासाठी आणि सत्तेसाठी याच्यासोबत त्याच्यासोबत गेले.
मनसे स्थापन झाल्यापासून १६ वर्षात कोणती आंदोलना झाली त्यावर पुस्तिका काढणार मनसेच्या आंदोलनाला सर्वाधिक यश मिळतंय. इतर पक्षांपेक्षा मनसेच्या आंदोलनाला यश मिळालं. टोलनाक्याच्या आंदोलनानंतर 65 ते 67 टोलनाके बंद झाले. आंदोलन यशस्वी झालं. ज्यांनी निवडणुकांच्या तोंडावर टोल बंद करण्याची केवळ घोषणा केली त्यांना प्रश्न विचारले जात नाहीत, आम्हाला प्रश्न विचारले जातात. मनसेच्या आंदोलनांची पुस्तिका काढणार
बाळासाहेब जी भूमिका बोलत होते भोंगे उतरले पाहिजे ती इच्छा आपण पूर्ण केली. आपण भोंगे काढा असे नाही म्हणालो, नाही काढले, तर हनुमान चालीसा लावू असे सांगितले. पण अजून काही ठिकाणी चरबी जिरलेली नाही. जिथे जिथे हे सुरु असेल तर पोलिसांना तक्रार दाखल करा. तरी झालं नाही तर मोठ्या ट्रकमध्ये स्पीकर लावून हनुमान चालीसा लावा.
आता म्हणतात राज ठाकरे हिंदुत्ववादी झाले. अहो मी हिंदुत्ववादी होतो आणि कट्टर मराठी कुटुंबात माझा जन्म झाला. पाकिस्तानी कलाकार जेव्हा धुडगूस घालत होते तेव्हा कुठे गेले होते हिंदुत्ववादी.
नरेंद्र मोदी यांनी पहिली पाच वर्षे उत्तर प्रदेश बिहार आणि उत्तराखंडकडे लक्ष द्यावे. त्या राज्यांमधील लोकं घरदार सोडून दुसऱ्या राज्यात जातात, त्यावेळी दुसऱ्या राज्यांना त्याचा त्रास होते. आज दोन प्रकल्प जातात याचे वाईट एका गोष्टीचे वाटतं. कुठल्याही राज्यात प्रोजेक्ट केले त्याचं वाईट नाही वाटतं. सर्व राज्यांची प्रगती झाली तर देश प्रगत होतो. नरेंद्र मोदी तुम्ही गुजरात गुजरात करू नका, प्रत्येक राज्य तुमचं अपत्य आहे, त्या प्रत्येक राज्याकडे समान पद्धतीनं पाहणं गरजेचं आहे. ही आपली धारणा होती, आहे आणि राहिल.
गुजराती आणि मारवाडी लोक महाराष्ट्रातून बाहेर गेले तर काय होईल? या राज्यपालांच्या वक्तव्यावरून राज ठाकरे यांनी राज्यपालांवर निशाणा साधला. "गुजरातच्या आणि मारवाड्यांना प्रथम विचारा की, तुमच्या राज्यातून उद्योगासाठी तुम्ही महाराष्ट्रात का आलात? उद्योग धंद्यांसाठी महाराष्ट्रात सुपीक जमीन आहे म्हणून दुसऱ्या राज्यातील लोक येथे उद्योगांसाठी येत आहेत. महाराष्ट्र मोठा होता आणि तो कायम मोठा राहिल. महाराष्ट्रात काय आहे हे कोश्यारींकडून ऐकायचं नाही, असा टोला राज ठाकरे यांनी यावेळी लगावला.
हल्ली कोणी काय येतंय काही बरळतंय. राजकीय पक्षाचे जे काही प्रवक्ते बोलत असतात अरे कोणती भाषा. मी असा महाराष्ट्र बघितला नाही. एक मंत्री एका महिलेला भिकारचोट म्हणतो. काय भाषा असते काय बोलत असतात. त्यांना वाटतं विनोद करतो. तू कोण आहेस, आपली लायकी काय आपण काय बोलतो. मला भीती वाटते, आताचे तरुण हे पाहत असतील आणि ते म्हणत असतील असे असते का राजकारण? मग ठीक आहे, जातीपातीचे विष कालवण्यासाठी हे सुरू आहे का?