महाराष्ट्रात सध्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेत्तृत्वात भारत जोडो यात्रा सुरु आहे. परंतु, या भारत जोडो यात्रेला राज्यात मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. मात्र, या यात्रेत काँग्रेस नेते राहुल गांधी पुन्हा एकदा स्वातंत्रवीर सावरकर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. वक्तव्यानंतर त्याचे राजकीय पडसाद उमटत आहेत. एकीकडे भाजपकडून राहुल गांधींवर टीका केली जात आहे. मात्र "जेव्हा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल वक्तव्य केलं, तेव्हा हे लोक शांत का बसले?" असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.
काय म्हणाले रोहित पवार?
एका वृत्तवाहिनीशी बोलताना रोहित पवार म्हणाले की, सत्तेतील लोकांचा भारत जोडो यात्रेवरुन लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न आहे. राजकीय विषय मला घ्यायचा नाही, पण खरा इतिहास काय हा समोर आला पाहिजे. पुस्तकात काय आहे, पत्रात काय आहे हे समोर यायला हवं असे रोहित पवार म्हणाले. शिवसेना नेते संजय राऊत यांनी सावकारांच्या मुद्द्यामुळे महाविकास आघाडीवर परिणाम होऊ शकतो असं वक्तव्य केलं, त्यावर मात्र रोहित पवार यांनी बोलण्याचं टाळलं आहे.
पुढे ते म्हणाले की, "जेव्हा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल वक्तव्य केले, तेव्हा हे लोक शांत का बसले?" सोबतच "हरहर महादेव चित्रपटात इतिहासात बदल करण्यात आला तेव्हा यांनी तोंड उघडलं नाही, हे कितपत योग्य आहे,?" असे प्रश्न रोहित पवार यांनी यावेळी उपस्थित केला.