सामनावीराचा मानकरी ठरलेल्या ग्लेन मॅक्सवेलने नोंदवलेल्या वादळी नाबाद द्विशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 19 चेंडूत बाकी ठेवत अफगाणचा 3 गड्यांनी पराभव करून उपांत्य फेरी गाठली.विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत कोणत्याही खेळाडूने नोंदवलेले हे पहिलेच द्विशतक आहे. त्याला क्रँपचा त्रास होऊ लागल्याने त्या वेदनांवर मात करीत त्याने झुंजार फलंदाजी केली. त्याची ही खेळी दीर्घकाळ क्रिकेटरसिकांच्या स्मरणात राहील, हे निश्चित आहे. त्याला साथ देणारा कमिन्स 12 धावांवर नाबाद राहिले. त्याने 68 चेंडू किल्ला लढतीत मॅक्सवेलला उत्कृष्ट साथ दिली. त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
याच पार्श्वभूमीवर आता रोहित पवार यांनी शरद पवार आणि मॅक्सवेलचा फोटो शेअर करत ट्विट केलं आहे. हे ट्विट शेअर करत रोहित पवार यांनी लिहिलं की, परिस्थिती कितीही विरोधात असली.. मैदानात ‘योद्धा’ जखमी झाला तरी वेदनांना गाडून त्यावर हास्याचा लेप लावत त्वेषानं लढावंच लागतं… नुसतं लढावंच लागत असं नाही तर शानदार पद्धतीने विजयही खेचून आणावा लागतो… अशा वेळी परिस्थितीही नक्कीच साथ देते… मग ते मैदान क्रिकेटचं असो की राजकीय! हेच काल ग्लेन मॅक्सवेलनं दाखवून दिलं. असे रोहित पवार म्हणाले.