मुंबई : मराठी भाषा गौरव दिनीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल बेळगावमध्ये भाषणाची सुरुवात कानडीतून केली. यामुळे राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच, आज बेळगावसह संपूर्ण सीमाभागाच्या मागणासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानात धरणे आंदोलन केले जात आहे. यावेळी मागण्यांचे निवेदन राज्य सरकारला देणार आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आंदोलनस्थळी भेट दिली आहे.
मराठी माणसाच्या हक्कासाठी हा लढा तुम्ही अनेक वर्षापासून आपण लढत आहोत. हा लढा तुम्ही जिवंत ठेवला त्याबद्दल, तुमचे मी आभार व्यक्त करतो. सीमा भागामध्ये राहणारे सर्व मराठी बांधव येथे आलात त्याबद्दल स्वागत करतो. ती पण आपलीच भूमी आहे आणि ही पण आपलीच भूमी आहे. त्यामुळे या दोन भूमी एक झाल्या पाहिजे.
कर्नाटक निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन डिवचलं जात आहे. तुम्हाला इलेक्शन कस लढायचे आहे. ते लढा पण, आमच्या मराठी अस्मितेला डिवचू नका. आणखी जास्तीत जास्ती या केसमध्ये वकील कसे सहभागी करता येतील त्यासाठी आम्ही सरकारला भाग पाडू. आपल्या, सर्वांच्या समोर हा निर्णय झाला पाहिजे. कुणीही आले तरी आपला महाराष्ट्र कधीही कुणासोबत झुकत नाही. मराठी माणूस कमी नाही 30 लाख मराठी माणसे त्याठिकाणी राहतात, असे त्यांनी म्हंटले आहे.
तुमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आहे. कर्नाटक मुख्यमंत्र्यांनी धमकी दिल्यानंतरही येथील मंत्री शांत होते. येथे खुर्चीत असणारे लोक गुहावटीला जाऊन साकडे घालत होते. आम्ही, मात्र तिकडे ज्योतिबाला आलो होतो, असा टोला रोहित पवारांनी शिंदे गटाला लगावला आहे.