विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. यातच युट्युबर ध्रुव राठी याने एक व्हिडीओ शेअर केला आहे. 'मिशन स्वराज' या नावाने ध्रुव राठीने हा व्हिडीओ शेअर केला आहे. मिशन स्वराज, महाराष्ट्राला एक असं राज्य बनवले पाहिजे ज्याचे स्वप्न छत्रपती शिवाजी महाराज पाहत होते.असे म्हणत त्याने हा व्हिडिओ शेअर केला आहे.
यावर प्रतिक्रिया देत रोहित पवार यांनी ट्विट केलं आहे. रोहित पवार म्हणाले की, प्रिय ध्रुव राठी, महाराष्ट्राला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी तसेच शाश्वत आणि समृद्ध महाराष्ट्र घडवण्यासाठी आमच्या सर्व योजना तयार असून याच मुद्द्यांना घेऊन लोकांमध्ये जात आहोत आणि राज्यभरातून लोकांचा आम्हाला प्रचंड पाठींबा मिळत आहे.
राहिला प्रश्न निधीचा तर सद्यस्थितीला महाराष्ट्राची तिजोरी खाली असली तरी तिजोरी खाली होण्याचे कारण आहे ते म्हणजे दलाली. महाराष्ट्राच्या सात लाख कोटीचा बजेटमधून मोठी रक्कम दलालीत जाते, यापैकी 50 हजार कोटींची प्रकरणे आम्ही पुराव्यासकट बाहेर काढली आहेत. या दलालीच्या दलदलीतून महाराष्ट्राला बाहेर काढून निधीची अडचण आम्ही दूर करू.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध असून लवकरच म्हणजेच 23 तारखेनंतर महाराष्ट्र स्वराज्याकडे मार्गस्थ होईल यात शंका नाही. असे रोहित पवार म्हणाले.