औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर करावे ही अनेक वर्षांपासूनची मागणी होती. त्यानंतर ठाकरे सरकराच्या काळात शहराचे नाव संभाजीनगर करण्यात आले. मात्र, त्यानंतर राज्यात शिंदे- फडणवीस सरकार आले. तेव्हा त्यांनी पुन्हा एकदा नाव बदलून छत्रपती संभाजीनगर केले. त्यावेळी या नामकरणावरून प्रचंड गदारोळ झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र, दरम्यान आता मुख्यमंत्री शिंदे यांनी छत्रपती संभाजीनगरला औरंगाबाद म्हंटले आहे. एका कार्यक्रमाची माहिती देतांना त्यांनी ट्विटरवर छत्रपती संभाजीनगरला औरंगाबाद म्हंटले आहे. त्यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेस नेते रोहित पवार यांनी चूक लक्षात आणून देत मुख्यमंत्री शिंदेंवर टीका केली आहे.
नेमकं काय म्हणाले रोहित पवार?
मुख्यमंत्र्यांची चुकी लक्षात आणून देतांना रोहित पवार म्हणाले की, मुख्यमंत्री महोदय आजच्या जाहिरातीत शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या फोटोचा जसा आपल्या पक्षाला विसर पडला तसाच औरंगाबादचं नामांतर छत्रपती संभाजीनगर केल्याचाही विसर पडलेला दिसतोय आणि विसर पडला नसेल तर नामांतराचा विषय तुम्ही केवळ राजकारणासाठी वापरता, असं समजायचं का? विरोधी पक्षाकडून अशी चूक झाली असती तर सरकारकडून त्याचं राजकारण झालं असतं. मला राजकारण करायची नाही, पण आपल्या कार्यालयाकडून झालेली चूक निदर्शनास आणून द्यायचीय. ती आपण दुरुस्त कराल, ही अपेक्षा! असे ते यावेळी म्हणाले.