विजयकुमार गावित म्हणाले होते की, दररोज मासे खाल्ल्यामुळेच ऐश्वर्या रॉयचे डोळे सुंदर आहेत. तुम्हीही दररोज मासे खाल्ले की तुमचेही डोळे सुंदर होतील. जिला पटवायचे तिला पटवूनच घ्याल. यावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया आल्या.
याच पार्श्वभूमीवर आता रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार म्हणाले की, मा. गावित साहेब... प्रेमात पडणं ही नाही तर शिक्षण, नोकरी, व्यवसाय ही आजच्या युवा वर्गाची प्राथमिकता आहे. त्यामुळे सल्ले द्यायचे असतील तर शिक्षण, नोकरी संदर्भात द्या... आणि हो...डोळे कसे दिसतात यापेक्षा त्या डोळ्यातलं पाणी बघणं, चिकण्या स्कीनऐवजी नोकरी मिळत नसल्याने टेन्शनमुळं तारुण्यातच युवांच्या चेहऱ्यावर पडलेल्या सुरकुत्या बघणं आणि काबाडकष्ट करणाऱ्या त्यांच्या आईवडलांच्या हातावरच्या भेगा पाहणं, हे तुमचं काम आहे! कारण तुम्ही मंत्री आहात! असे रोहित पवार म्हणाले.
आदिवासी मंत्री विजयकुमार गावित यांनी त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. विजयकुमार गावित म्हणाले की, माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. ऐश्वर्या राय ही माझ्या मुलीसारखी आहे. फिश ऑईलचे फायदे आदिवासी लोकांना समजावून सांगत होतो. आरोग्यासाठी मासे चांगले असल्याचं मी म्हणालो. असे गावित यांनी सांगितले.